कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम बड्या नेत्यांची प्रतिष्ठा लागून राहिलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत हसन – किसन या जोडगोळीला करिष्मा केल्याचे सायंकाळी उशिरा पर्यंत चाललेल्या निकालातून पुन्हा एकदा दिसून आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने निर्विवाद विजय मिळवला. विजय स्पष्ट होताच गुलालाची उधळण करण्यात आली. मेहुण्यांना पाहुणे भारी ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रामुख्याने हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या आजी-माजी पालकमंत्र्यामध्ये प्रतिष्ठेची लढत झाली होती. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीत आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्यासह पाच माजी आमदारांचा समावेश होता.
हेही वाचा : इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द
प्रमुख पराभूत
विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक ,खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे आदींनी केले होते. तर सत्ताधारी आघाडीला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी विरोधी छावणीत जाणे पसंत केले होते. मात्र ए. वाय. पाटील यांच्यासह आमदार आबिटकर यांचे भाऊ अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खराटे, संचालक बाबासाहेब पाटील, माजी संचालक के. जी. नांदेकर आदी प्रमुखांना पराभवास सामोरे जावे लागले.
हेही वाचा : मग ते वानखेडे , ब्रेबाँन… कोठेही शपथ घेऊ शकतात; हसन मुश्रीफ यांचा चंद्रशेखर बावनकुळे यांना टोमणा
‘लई भारी’ सत्तेत
बिद्रीच्या सत्ताकाळात आणि प्रचारात के. पी. पाटील यांनी ‘लई भारी कारभार’ असे घोषवाक्य बनवले होते. त्याला सभासदांनी प्रतिसाद देत पाटील यांच्यासह सर्व संचालकांनी सरासरी ७ हजाराच्या मताधिक्याने विजयी केले. विजयी आघाडीत ८ विद्यमान संचालक विजय झाले तर ३ माजी संचालक पुन्हा सत्तेत आले. ११ चेहरे प्रथमच संचालक मंडळात सामावले गेले आहेत.