कोल्हापूर : पोर्श कार अपघात प्रकरणानंतर मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून वाद निर्माण केला जात आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांनी हक्कभंग ठराव दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागावी असे मागणी केली आहे. मात्र मी शंभूराजे देसाई यांच्या धमक्यांना घाबरणार नाही. हसन मुश्रीफ यांचीही माफी मागणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार रवींद्र धंगेकर यांनी येथे बोलताना केले.

पत्रकारांशी बोलताना धंगेकर म्हणाले, पुण्यात अनेक तरुण, नोकरवर्ग येतोय. पुण्यात पब संस्कृती आली. उडता पंजाब सारखं उडतं पुणे अशी संस्कृती पुण्यात तयार झाली. अग्रवाल अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाऊन दोन दोन फिर्यादी नोंदवून घेतल्या. एका मधून त्यांना सोडून देण्यात आलं. तपास अधिकारी यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीने नेली आहे. मात्र सरकारचा दबाव येऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. ससूनवर जे आरोप केले त्यामुळे मुश्रीफ यांना राग आला. मी त्यांचे पाया पडून माफी मागतो. मात्र पब संस्कृती संपली पाहिजे, अशी अट धंगेकर यांनी घातली.

हेही वाचा : जून उजाडत आला तरी कोल्हापूर महापालिकेची नाले सफाईची कामे गाळातच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धंगेकर पुढे म्हणाले, शाहू, फुले , आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कामं करताना मला कोणाचीही भीती वाटत नाही. मला कोणीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तर मीं घाबरणार नाही. माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावर येईल. भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत आहेत. मुश्रीफ कसं वागतात ते त्यांनाच माहिती. तावरे हा चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे. प्रशासन तावरेच्या पाठीमागे होते. डीन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. यात सुद्धा शंका आहे. अजय तावरेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. हसन मुश्रीफ यांची ही चूक आहे. तावरेंना चौकात आणून फाशी दिली पाहिजे. मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही. मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधले असता धंगेकर म्हणाले, माझ्यावर हक्क भंग करणाऱ्याच्या मतदार संघात जाऊन मी तिथं स्पष्टीकरण द्यायला तयार आहे. पुण्यात बिल्डर लोकांचा राज सुरू आहे. पोलीस सुपाऱ्या घेऊन कामं करतात, असा आरोप धंगेकरांनी केला.