कोल्हापूर : राधानगरी धरण आमच्यासाठी ऊर्जास्थळ, प्रेरणास्थळ आहे. शाहू महाराजांनी साकारलेल्या राधानगरी धरणस्थळी गेली पाच वर्ष जयंती साजरी करत आहोत. पुढील जयंतीला येताना आमदारकीचा गुलाल घेऊन येणार, असा निर्धार शाहू उद्योग समूहाचे नेते, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी बुधवारी व्यक्त केला.
कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीची उमेदवारी मिळणार असताना आता त्यांचे गेल्या वेळेचे प्रतिस्पर्धी समरजितसिंह घाटगे यांनीही आज निवडणुकीत उतरण्याचा इरादा व्यक्त केला आहे. यामुळे कोल्हापुरातील महायुतीतील बड्या नेत्यातील मतभेद या निमित्ताने पुढे आले आहेत.
हेही वाचा : …तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा
या कार्यक्रमात बोलताना घाटगे म्हणाले, कागलची ओळख राजकीय विद्यापीठ अशी चुकीच्या पद्धतीने काही मंडळींनी तयार केले आहे. त्याची आम्हाला खंत वाटते. आगामी काळात राजर्षी शाहूंची जनभूमी असलेल्या कागलची आदर्श शहर अशी ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. राधानगरी धरण ठिकाणी पर्यटन वाढावे आणि यातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्वत्र जावी हा जयंती करण्याचा मुख्य हेतू आहे. यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, भगवानराव काटे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. संभाजी आरडे यांनी प्रास्ताविक, विलास रणदिवे यांनी आभार मानले.
शाहू कारखाना कार्यस्थळावर अभिवादन
बहूजन समाज उद्धारक, लोकराजा छत्रपती राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन संपन्न झाले. प्रधान कार्यालयातील कागल संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रतिमेचे व कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पुतळ्यासही घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील, सतीश पाटील माजी संचालक एम आय चौगुले यांनी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, आदींसह शाहू ग्रूपमधील विविध संस्थाचे पदाधिकारी,सभासद शेतकरी अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परीसर दुमदुमुन गेला .