कोल्हापूर : भारत आणि इंडोनेशियामधील आर्थिक संबंध लक्षणीयरीत्या वाढत आहेत. या संबंधांना पुढे नेण्याचे काम कोल्हापूरातून होऊ शकते. या भागातील नानाविध अभियांत्रिकी उत्पादने, साखर- साखर उद्योगाचे सुट्टे भाग, वस्त्रोद्योग, पॅकिंग मटेरियल आदी उद्योगास इंडोनेशियात निर्यात करण्याची मोठी संधी आहे. त्याचा लाभ काही स्थानिक उद्योजक घेत असून आणखी अनेकांनी ही संधी साधली पाहिजे, असे मत इंडोनेशियाचे
इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
भारत-इंडोनेशिया या दोन देशांतील व्यापारी, औद्योगिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच कोल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठी येथे उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत ते बोलत होते.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या चर्चेमध्ये अश्विन दनिगोंड, मनोज झंवर, संजय पेंडसे, कमलाकांत कुलकर्णी, धैर्यशील पाटील, रोनक शहा, जयेश ओसवाल, सचिन शिरगावकर , हर्षवर्धन मालू, अतुल मालपाणी आदींनी भाग घेतला.
इंडोनेशिय कौन्सिलेट अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख इको ज्युनॉ यांनी भारतातील उद्योजकांना इंडोनेशियामध्ये असलेल्या निर्यात संधीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आशियाई प्रदेशात इंडोनेशिया भारताचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार आणि सर्वात मोठा आयात व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये भारत आणि इंडोनेशियामधील द्विपक्षीय व्यापार २८.१६ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. भारताची इंडोनेशियाला होणारी निर्यात ५.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.
भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीमध्ये इंडोनेशिया ३७ व्या स्थानावर आहे. ज्याची एकत्रित एफडीआय रक्कम ६५९.३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. भारतातून इंडोनेशियाला निर्यात होणाऱ्या प्रमुख वस्तूंमध्ये अभियांत्रिकी वस्तू (१.९४ अब्ज डॉलर), पेट्रोलियम उत्पादने (६९२.१६ दशलक्ष डॉलर), सेंद्रिय आणि अजैविक रसायने (१२.३९ दशलक्ष डॉलर), इतर (२७४.०४ दशलक्ष डॉलर) आणि तेलबिया (९८.५३ दशलक्ष डॉलर ) यांचा समावेश आहे. जागतिक समस्यांना चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय सहकार्य लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी भारत आणि इंडोनेशियाने १६ जुलै २०२३ रोजी एक नवीन व्यापार चॅनेल सुरू केले. नव्याने स्वाक्षरी झालेल्या भारत-इंडोनेशिया आर्थिक आणि वित्तीय संवादात द्विपक्षीय गुंतवणूक, वित्तीय सेवा आणि पायाभूत सुविधा विकास हे सहकार्याचे क्षेत्र म्हणून पाहिले जाईल.
भारत आणि इंडोनेशियाचे दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. दोन्ही देश सागरी शेजारी आणि धोरणात्मक भागीदार असल्याने त्यांचे महत्त्वाचे आणि जवळचे संबंध आहेत. येत्या काळात वाढत्या द्विपक्षीय आणि सामुदायिक संबंधांसह दोन्ही देशांमध्ये आणखी वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे, असे यावेळी सांगण्यात आले.