जनसुराज्य पक्षाची भाजपबरोबर आघाडी; अडचणीतील कारखान्यांना संजीवनी ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापुरातील राजकीय व सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या जनसुराज्य शक्ती  पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी बुधवारी महायुतीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा भाजप व जनसुराज्य या दोन्हीही पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी होणार आहे. कोरे यांच्या राजकारणाचे बलस्थान असलेल्या सहकारी संस्था अडचणीत आल्या असताना केंद्र व राज्य शासनाने भरीव मदत होऊन त्यांना संजीवनी मिळणार आहे. तद्वत मतदारसंघातील राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी हा निर्णय फलदायी ठरणार आहे. खेरीज त्यांची राजकीय कोंडी पाहता असा निर्णय घेण्यावाचून पर्यायही नव्हताच. कोरे यांना आपले अस्तित्व सिद्ध करताना शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संघर्ष करावा लागणार आहे.

सहकारातील वारणाचे जनक तात्यासाहेब कोरे यांचे विनय कोरे हे नातू. तात्यासाहेबांनी सहकार फुलवताना राजकारणापासून चार हात दूर राहणे पसंत केले. तरुण, अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या विनय कोरे यांना राजकारणात उडी घेऊन पाच वेळा आमदार असलेले काँग्रेसचे यशवंत एकनाथ पाटील यांना पराभूत केले. दुसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून निवडून आल्यावर त्यांना अपारंपरिक ऊर्जामंत्रिपद  मिळाले. तिसऱ्या वेळी त्यांनी राज ठाकरे, शेकापचे जयंत पाटील यांच्या सोबत राज्यात नवी आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील-सरुडकर यांनी त्यांचा पराभव केला. ‘जनसुराज्य’ च्या साथीमुळे  पश्चिम महाराष्ट्रात भाजपला याचा अधिकचा  फायदा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाकांक्षी विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली खरी पण तिचा विस्तार करताना वारणा साखर, दूध, बाजार या महत्त्वाच्या सहकारी संस्थांकडे दुर्लक्ष झाले. त्या प्रचंड अडचणीत आल्या. ऊस, दूध यांचे देयके विलंबाने मिळू लागल्याने शेतकरयाची नाराजी निवडणुकीत भोवली. भाजपने हे पाहून त्यांना मदतीसाठी हात दिला.  मुख्य म्हणजे शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात भाजपचे कमळ  फुलणार नसले, तरी कोरे यांच्या रूपाने अन्य विरोधकांवर मात करण्याची संधी भाजपला मिळणार आहे.

िंगायत समाजाशी जवळीक

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात भाजप पक्ष वाढवण्यावर भर दिला आहे. खासदार संभाजीराजे व शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे यांच्यामुळे भाजपला मराठा समाजात प्रभाव पाडण्यास  मदत झाली. आता कोरे यांच्या रूपाने त्यांचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील लगायत समाजात प्रतिमा उजळण्यास मदत होणार आहे. राष्ट्रवादीला मात्र ऐन निवडणुकीत एक चांगला मित्रपक्ष गमवावा लागला आहे.

कोरे यांचा मुकाबला मित्रांशीच

राज्यातील महायुतीत जनसुराज्य शक्ती या आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडली असली, तरी कोरे यांना राजकारणाच्या आखाडय़ात शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील तर सहकाराच्या मळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी या मित्रपक्षांशी मुकाबला करावा लागणार आहे. या लढ्यासाठी त्यांना भाजपचे बळ उपयुक्त ठरणार आहे. शेट्टी यांनी तर जनसुराज्यशी आघाडी करण्यास आम्ही बांधील नसल्याचे सांगत त्याची आजच चुणूक दाखवून दिली आहे.

कोरे यांची ताकद

  • सहकारातील वारणाचे जनक तात्यासाहेब कोरे यांचे विनय कोरे हे नातू
  • विनय कोरे यांची संस्थात्मक ताकद मोठी
  • जनसुराज्यच्या ताकदीचा भाजपला फायदा
  • कोरे यांचा संघर्ष स्वाभिमानी व शिवसेनेशी होण्याची चिन्हे
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jan surajya shakti party alliance with bjp
First published on: 27-10-2016 at 01:31 IST