कोल्हापूर : गणरायाचे मनोभावे पूजन केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक निघाल्या. एकीकडे पारंपरिक वाद्याचा गजर तर दुसरीकडे कर्णकर्कश वाद्याच्या भिंती असे दृश्य पाहायला मिळाले. २५ तासांहून अधिक काळ कोल्हापूर, इचलकरंजी या महापालिका शहरांमध्ये मिरवणूक चालली. ती पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जनसागर लोटला होता.
दरवर्षी गणरायांना निरोप देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशीला जल्लोषात मिरवणूक काढली जाते. सकाळी साडेनऊ वाजता मानाच्या पहिल्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणरायाचे पूजन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता आदींनी केले.
गणरायाचा जयघोष करत शांततेत मिरवणुका सुरू होत्या. पारंपरिक मार्ग असलेल्या मिरजकर तिकटी, खांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश या मार्गावर दुपारपासूनच मंडळांच्या रांगा लागल्या होत्या. समांतर मार्ग असलेल्या बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, देवल क्लब येथेही मिरवणुका पाहण्यासाठी गर्दी लोटली होती. तर पर्यायी मार्ग असलेले हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, देवकर पाणंद येथेही गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जागोजागी उभे होते. राजकीय-सामाजिक नेत्यांनी मिरवणुकीत ठेका धरल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
कानठळ्या बसवणारा कल्लोळ
पारंपरिक वाद्याच्या गजरात अनेक मंडळांनी मिरवणुका काढल्या. ऐतिहासिक, पौराणिक प्रसंगावर आधारित सादरीकरण करण्यात आले होते, अशा मंडळाचे भाविकांनी स्वागत केले. तर सायंकाळी वाद्यांच्या भिंतीमुळे कानठळ्या बसवणारा कल्लोळ उठला होता. कानात कापूस घालूनही आवाजामुळे थरकाप उडत होता.
सौम्य लाठीमार
मिरवणुका अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होत्या. अशा मंडळांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. हुल्लडबाजी करणाऱ्या बघ्यांवर लाठी चालवण्याची वेळ आली. रात्री बारा वाजता वाद्य वाजवण्याचे थांबवण्यात आले. परंतु, सकाळी सहानंतर पुन्हा मिरवणुकीस सुरुवात झाली. सकाळी सात वाजता मिरजकर तिकटी येथून इराणी खण येथे शेवटचा गणपती आणण्यात आला. दुपारी कसाब बावडा येथील काही मंडळाचे गणपती मिरवणूक मार्गावर आणण्यात आले होते.
इचलकरंजीत जल्लोष
तब्बल २५ तास ३० मिनिटे चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पंचगंगा नदी पात्रात ४१६ तर शहापूर खणीत १७ श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ही मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य मार्गावर रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. आज सकाळी नदी मार्गावर श्रींच्या मूर्तीं विसर्जनासाठी रांग लागली होती. मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पूजन खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता, महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पोलिसांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरत श्रींची मिरवणूक काढली.
फलकाद्वारे जनजागृती
विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी २० स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. सेवाभारती हॉस्पिटलच्यावतीने वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. सायंकाळनंतर वाद्यांच्या कर्णकर्कश आवाजाने भाविक त्रस्त झाले होते. इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने शहराच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, वाद्यांचा दणदणाट आणि रेल्वे मार्गाबाबत जनजागृतीचे फलक घेऊन फेरी काढण्यात आली.