एरवी राजकीय पक्षांची कार्यालये राजकीय हालचालींचे केंद्र बनलेले असते. राजकीय वास येणाऱ्या प्रत्येक घटना घडत असताना कोल्हापुरातील जिल्हा समितीची नवी प्रशस्त इमारत करोना संकट निवारणाच्या कार्यासाठी देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीचे प्रशस्त सभागृह सर्व सुविधा, वाहनतळासहित वापरास देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

करोनाबाधित, संशयित वा संस्थात्मक अलगीकरण यासाठी शासन नव्या जागा, इमारतींचा शोध घेत आहे. या कामाला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या सूचनेवरून करोनाच्या लोकांच्या वापराकरिता समितीचे १०० फूट बाय ६० फूट आकाराचे सभागृह, सर्व सुविधा, वाहनतळासहित वापरास देण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य गुलाबराव घोरपडे ,काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार वाईकर यांनी आज जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना देण्यात आले. आरोग्याप्रती महत्त्वाच्या क्षणी राजकीय पक्षाचे कार्यालय वापरासाठी देण्याचा हा महाराष्ट्रात पहिलाच प्रयत्न आहे.

डॉक्टरांना हजार पीपीई संच

करोनामुळे नागरिकांना आरोग्यसेवा देताना डॉक्टरांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त झाले आहे. ‘आरोग्यसेवा देऊ पण आम्हाला संरक्षण म्हणून पीपीई संच (किट) द्यावे,’ अशी मागणी डॉक्टर करत होते. आमदार ऋतुराज पाटील यांनी शहरातील नगरसेवक, ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून हे किट देण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार एक हजार किट त्यांनी तयार करून घेतली आहेत. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिनी डॉक्टरांना किट वाटप केले जात आहे. दोन दिवसांत वाटप पूर्ण करण्यात येईल असे ऋतुराज पाटील यांनी आज सांगितले.