कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची मालमत्ता सर्वाधिक २९७ कोटी रुपयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरातील अन्य उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक, हातकणंगलेतील शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांची मालमत्ता कोटींच्या घरात आहे.

  शाहू महाराजांच्या नावे स्थावर व जंगम अशी २९७ कोटींची संपत्ती आहे. त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटींची संपत्ती आहे. शाहूमहाराज हे निष्कर्जी आहेत. त्यांच्या नावे असलेल्या जमिनीची किंमत १२२ कोटी रुपये असून, आलिशान वाहनांची किंमत सहा कोटींवर आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. चेतन नरके यांची माघार; पाठिंब्याचा निर्णय गुलदस्त्यात

मंडलिकांच्या मालमत्तेत वाढ

संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी रुपयांची संपत्ती असून, मागील निवडणुकीपेक्षा  संपत्तीत चार कोटी ६५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता नऊ कोटी ७१ लाख रुपये इतकी होती. ती आता वडिलोपार्जित मालमत्तेसह १४ कोटी ३७ लाख रुपये झाली आहे. त्यांच्यावर तीन कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज आहे.

मानेंचा धनसंकोच

 खासदार धैर्यशील माने यांची मालमत्ता पाच वर्षांत ३० लाखांनी घटली आहे. त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता चार कोटी ४५ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्यावर दोन कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. सन २०१९ मध्ये त्यांची संपत्ती चार कोटी ७५ लाख रुपयांची होती.

हेही वाचा >>>कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी

शेट्टींची मालमत्ता वाढली

शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या संपत्तीत ४५ लाखांनी वाढ झाली आहे. त्यांची मालमत्ता गेल्या निवडणुकीवेळी दोन कोटी ३६ लाख रुपये होती. आता ती दोन कोटी ८१ लाख रुपये एवढी झाली आहे. त्यांच्यावर दोन कोटींचे कर्ज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तीन कोटी ५७ लाख रुपये आहे. त्यांच्या नावे सहा लाख रुपयांचे कर्ज असून, सव्वालाखाची रोख रक्कम आहे. एक इनोव्हा मोटार आणि मुंबई, कोल्हापुरात सदनिका आहेत. सरूड येथे दोन एकर, बोरबेट येथे तीन एकर शेती आहे.