scorecardresearch

कोल्हापूर : मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर शिवसेनेतील वाद उफाळला

माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीवरून शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी कोल्हापूर शिवसेनेतील वाद उफाळला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी शिवसेनेतील वाद उफाळून आला. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार चंद्रदीप नरके हे उपस्थित राहिल्याने त्यांना पक्षात राहण्याचा अधिकार नाही, असे पत्रक आज (शनिवार) प्रसिद्ध करण्यात आले.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे दोन वेळा कोल्हापूरला आले. प्रथम चंद्रकांत पाटील यांच्या आईचे निधन झाल्यानंतर तर आज आमदार अनिल बाबर यांच्या आईचे निधन झाल्याने सांत्वन करण्यासाठी. या दोन्ही वेळी शिवसेनेचे माजी आमदार नरके शिंदे यांच्या सोबत होते. या उपस्थितीवरून शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

…त्यांना शिवसेनेत राहण्याचा अधिकार नाही –

गेल्या काही दिवसांपासून नरके शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. संजय मंडलिक यांना शिंदे गटात आणण्यासाठी ते सक्रिय राहिले. त्यामुळे त्यांना शिवसेनेत राहण्याचा अधिकार नाही. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी शहर शाखेने केली.

शिवसैनिकांची धरपकड –

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे येथे आढावा बैठक घेणार असल्याने शिवसेनेने त्यांच्यासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला होता. अब्दुल सत्तार व संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होणार होते. तथापि त्यापूर्वीच पोलिसांनी जिल्हाप्रमुख, शिवसैनिक, युवा सैनिक यांना ताब्यात घेतले. केंद्रशासन दडपशाहीचा कारभार करीत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळातही राज्यात, जिल्ह्यात याचीच याचाच प्रत्यय येत आहे, असे म्हणत शिवसेनेने अटकेच्या प्रकाराचा निषेध नोंदवला.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.