कोल्हापूर : रत्नागिरी – नागपूर महामार्गाच्या मोजणीला विरोध करीत सोमवारी शेतकऱ्यांनी हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकले. प्रशासनाच्या या प्रयत्नाच्या विरोधात एका शेतकऱ्याने भूमी अभिलेख कार्यालयासमोर झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींचे पिंडदान करील संताप व्यक्त केला.

रत्नागिरी नागपूर मार्गापैकी अंकली ते चौकात या मार्गावर संपादित जमिनीसाठी चौपट भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे झालेल्या बैठकीत अशा प्रकारे भरपाई देण्यात येईल असा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच प्रशासनाकडून मोजणीचा प्रयत्न सुरू आहे. २७ ऑक्टोबर रोजी शिरोळ व हातकणंगले येथे मोजणी सुरू झाली. तेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन करून ती हाणून पाडली होती. भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी रूपाली चौगुले यांनी दिले होते. परंतु त्यानंतर अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटीसा आल्याने सोमवारी शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, विजय पाटोळे या शेतकऱ्याने कार्यालयासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी या कार्यालयाकडे फिरकले नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले.

तालुका भूमी अभिलेखचे कर्मचारी अतिग्रे, अंकली, चोकाक, माणगाव वाडी , मजले या गावात चौपदरी महामार्गासाठी जमीन मोजणीच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच भूमी अभिलेख कार्यासमोर शेतकरी जमा झाले होते. त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यालयाच्या समोरच दुपारी जेवण बनवत राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध केला. शेतकऱ्यांना शासन फसवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर खासदार धर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर, आमदार अशोक माने यांनी शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत हे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे टीका करून त्यांना टीका यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताची भाषा भाषणामध्ये करायचे आणि प्रत्यक्षात त्या विरोधातील भूमिका घ्यायची या प्रकारा विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

भूमी अभिलेख कार्यालय हातनंगले येथे ठिय्या आंदोलन सुरू केलेल्या कार्यकर्त्यांनी नंतर शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या निषेधार्थ पिंडदान करून शंखध्वनी केला.या आंदोलनामुळे कोल्हापूर सांगली महामार्गावर वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.