कोल्हापूर : गॅस एजन्सीकडून पुरवठा खंडित झाल्याने येथील संभाजीनगर परिसरात संतप्त नागरिकांनी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवत रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित एजन्सीने पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित झाला असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. याचा राग व्यक्त करीत नागरिकांनी रस्त्यावर गॅस टाक्या ठेवून आंदोलन केले.
आमदारांसमोर आंदोलन
दरम्यान, याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी ताफा थांबवून संबंधित घटनेची माहिती घेतली. नागरिकांनी आपल्या गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना आमदार क्षीरसागर यांच्यासमोर व्यक्त केल्या.
क्षीरसागरांच्या प्रयत्नात यश
आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, तसेच हिंदुस्तान पेट्रोलिअम गॅस कंपनीचे विक्री व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करून तत्काळ गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. गॅस वितरक कंपनीकडून पुढील अर्ध्या तासात गॅसपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही क्षीरसागर यांना देण्यात आली. यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
शहरातील विविध भागांतील गॅस एजन्सींमध्ये नागरिकांनी आठ-दहा दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केली आहे. तरीही अद्याप पुरवठा करण्यात आलेला नाही. एजन्सीच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो उचलला जात नाही, अशी तक्रार अनेक ग्राहकांनी केली. त्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढली असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित एजन्सीने गॅस वितरक कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही. यात एजन्सी दोषी असल्याचे मत नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर मांडले. घटनेची चौकशी करून सदर एजन्सी वितरणास पात्र नसेल, तर ती दुसऱ्यास चालवण्यासाठी देण्यात यावी, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये, अशा सक्त सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या.
‘गॅस एजन्सीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा कार्यालयाची आहे, पण ते फक्त कंपनीच्या सेल्स अधिकाऱ्याचा नंबर देतात,’ अशी तक्रार नागरिकांनी केली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गॅसपुरवठा खंडित राहणे ही गंभीर बाब असून, यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
