कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत चालली असल्याचे मंगळवारी केलेल्या संयुक्त पाहणी वेळी दिसून आले. कोल्हापुरातील जयंती नाल्याचे तसेच कसबा बावडा येथील छत्रपती कॉलनीतील नाल्याचे काळे फेसाळलेले मलमिश्रित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा प्रकार दिसून आला. यावेळी कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, करवीर प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी आणि उच्च न्यायालयाचे याचिकाकर्ते दिलीप देसाई उपस्थित होते.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणात भर पडत चालली आहे. कोल्हापूर, शिरोळ येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली आहे. तर इचलकरंजी येथे काळेकुट्ट पाणी नदीतून वाहत आहे. या विरोधात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पर्यावरण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यांनी संयुक्त पाहणी करण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच करवीर, इचलकरंजी उपविभागीय कार्यालय यांनी दुर्लक्ष केले होते. त्यावर देसाई यांनी २०१० प्रमाणे पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आयुक्त तसेच करवीर, इचलकरंजी उपविभागीय अधिकारी यांना मंगळवारी न चुकता संयुक्त पाहणी करण्यासाठी हजर राहण्याचे पत्र पाठवले. तसेच उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही सूचित केले होते. त्यावर कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच दोन्ही उपविभागीय कार्यालयांना जाग आली. त्यानुसार आज कोल्हापूर महापालिकेचे उपआयुक्त अंकुश पाटील, करवीर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भालचंद्र यादव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते दिलीप देसाई यांनी आज संयुक्त पाहणी केली.

हेही वाचा – कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले

हेही वाचा – कोल्हापूर: १०० कोटींची रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिक कृती समितीचे आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची सुरुवात आज कोल्हापुरातून झाली. कसबा बावडा येथील छत्रपती कॉलनी येथून नाल्याद्वारे काळे, फेसाळलेले पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे दिसून आले. कोल्हापुरातील जयंती नाल्याच्या ठिकाणी साचलेले प्लास्टिक महापालिका यंत्रणेने दूर केले. तथापि या नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी एसटीपी प्रकल्पामध्ये न जाता ते पंचगंगेमध्ये मिसळत असल्याचे दिसून आले. या सर्व बाबी आजच्या अहवालामध्ये नमूद केल्या जाणार आहेत. तसेच या निमित्ताने पंचगंगा नदी प्रदूषित होत असताना कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच करवीर, इचलकरंजी प्रांत कार्यालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची निष्क्रियता दिसून आली आहे.