कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून पाठबळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या मागणीसाठी गावोगावी आंदोलने होत आहेत. रांगोळी (ता. हातकणंगले) येथेही उपोषण करण्यात येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज येथे सकल मराठा समाजाची बैठक होऊन आंदोलनाला मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर येथून किमान एक ट्रक जीवनावश्यक वस्तू येत्या दोन दिवसांत पाठवले जाणार आहे. वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, उमेश पवार, रुपेश पाटील, राजू सावंत, संदीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, राहुल इंगवले, बाबा महाडिक, शैलजा भोसले, सुनीता पाटील, सुधा शिंदे, गीता हसुरकर, बबिता जाधव, नीलेश चव्हाण, अनिल घाटगे, उदय लाड उपस्थित होते.

रांगोळीत सर्वधर्मीयांचे पाठबळ

मुंबई येथील मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आंदोलनास रांगोळी ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. आज लाक्षणिक उपोषणस्थळी पाठिंबा दर्शवण्यात आला. छत्रपती शिवाजी मार्केट माळभाग येथे झालेल्या उपोषणात मराठा, लिंगायत, जैन, बौद्ध, मातंग, कुंभार, मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळत आहे. पिंटू देसाई, सुनील काटकर, प्रवीण शेट्टी, बापुसो मुलानी, विजय माने, कुबेर कांबळे आदी या उपोषणात सहभागी झाले होते.