कोल्हापूर : यंत्रमागाच्या वीजदर सवलतीसाठी अर्ज भरणे बंधनकारक राहील. मात्र ही प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. याकरिता यंत्रमागधारकांना ‘ऑनलाइन’ तसेच ‘ऑफलाइन’ अर्जाद्वारे मागणी नोंदवता येईल, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीवेळी स्पष्ट केले.
राज्यातील यंत्रमागाच्या वीजदर सवलतीसाठी ‘ऑनलाइन’ नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या विरोधात राज्यातील यंत्रमागधारकांनी नाराजीचा सूर लावला होता. तर लोकप्रतिनिधींनी यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. आमदार राहुल आवादे यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्री सावकारे यांच्या दालनात या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीला आमदार राहुल आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सचिव अंशू सिन्हा, सहसचिव श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांना वस्त्रोद्योगासाठी काही योजना तयार करायच्या असल्यास त्यास डाटा (विदा) असणे आवश्यक असते. तसा डाटा दोन्ही सरकारकडे नसल्याने नवीन योजना करणेसाठी अनेक अडचणी येत आहेत. यामुळे ‘ऑनलाइन’ विदा गोळा करण्याचे काम सुरू आल्याचे वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी सांगितले.
वीजदर सावलीसाठी ‘ऑनलाइन’ अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. त्यासाठी ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ पद्धतीने अर्ज भरावेत. ‘ऑफलाइन’ अर्ज वस्त्रोद्योग केंद्रातील संबंधित यंत्रमागधारक संघटनांकडे सादर करावेत. तेथून ते वस्त्रोद्योग विभागाकडे पाठवता येतील, अशी सूचनाही सावकारे यांनी केली.
यावेळी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व इतर यंत्रमाधारक संघटनांनी ‘ऑफलाइन’ अर्ज भरताना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. यावर सविस्तर चर्चा होऊन येत्या शुक्रवारी वस्त्रोद्योग सचिव यांच्याकडे बैठक होईल. आणि यामध्ये सर्वांना डाटा भरता येईल अशा पद्धतीचा ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ अर्ज दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन, एअरजेट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी तयार करतील असे ठरले. नवीन अर्ज तयार झाल्यानंतर ‘ऑफलाइन’ अर्ज दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व एअरजेट असोसिएशनमध्ये जमा करता येतील. जमा झालेले अर्ज नागपूर टेक्सटाईल कार्यालयाकडे पाठवतील असे ठरले. तसेच ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ रजिस्ट्रेशनचा वीज देयक अनुदानाशी कोणताही संबंध असणार नाही. आमदार राहुल आवादे यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्री सावकारे यांच्या दालनात या संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीला आमदार राहुल आवाडे, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सचिव अंशू सिन्हा, सहसचिव श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.