कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने करण्यात येणारे रस्ते काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार तसेच ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांना आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकी वेळी थेट आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांच्यावरच नाराजी व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांना काम करण्याचे आदेश न देता थेट प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि कामांमध्ये सुधारणा घडवून आणावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले होते.

यानंतर शहरातील रस्त्यांची पाहणी आयुक्तांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. महापालिकेच्या निधीमधून रस्ते कामे सुरू न झाल्याने तसेच केलेल्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने प्रशासकांनी उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना त्यांची वार्षीक वेतनवाढ का थोपवू नये, उपशहर अभियंता यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार का काढून घेऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली.

शहर अभियंता रमेश मस्कर यांनी निधी मंजूर झाला असतानाही उपशहर अभियंता यांच्यावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनी मंजूर कामे विहित मुदतीत सुरू न केल्याने नोटीस बजावली आहे.

आयुक्तांनी अचानक रस्ते कामाची पाहणी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांच्या समवेत केली. टेंबलाई उड्डाणपूल ते टाकाळा, पी.एन. पाटील बंगला ते विजय बेकरी, सायबर चौक ते माउली पुतळा चौक ते जगदाळे हॉल राजारामपुरी, गोखले कॉलेज चौक ते यल्लमा मंदिर ते हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर, आयटीआय कॉलेज, कळंबा साई मंदिर, नवीन वाशीनाका, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर ते फुलेवाडी नाका ते जाऊळाचा गणपती मंदिर, गंगावेश ते महापालिका मुख्य इमारत, वायल्डर मेमोरियल चर्च ते आदित्य कॉर्नर या ठिकाणी केली.

यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शासनाच्या व महापालिकेच्या स्वनिधीमधून मंजूर असलेली कामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. शहरातील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला असून, विहित कालावधीत निधी मंजूर करूनही कामे पूर्ण केली नसल्याने ही कामे तातडीने करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सदर ठिकाणी पुन्हा सर्व कामांची गुणवत्ता व रस्त्यांची तपासणी करणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले. यामध्ये दिरंगाई झाल्यास उपशहर अभियंता यांच्यावर सक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर फुलेवाडी रिंग रोडसाठी दीड कोटी मंजूर केले असल्याने सदरची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर उर्वरीत रस्ते दुरुस्तीसाठी चारही विभागीय कार्यालयांना निधी महानगरपालिका स्वनिधीमधून मंजूर करण्यात येणार आहे. महापालिकेच्या निधीमधून एक कोटी चारही विभागीय कार्यालयांना पहिल्या टप्प्यात पॅचवर्कच्या कामासाठी दिले होते.

यामध्ये फक्त प्राथमिक कामे पूर्ण करण्यात आली असून, सिल्कोट मारण्यात आले नसल्याचे आढळून आले. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी मंजूर केले आहेत. ती कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आल्याने उपरोक्त कारवाई करण्यात आली.