कोल्हापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रस्ते कामांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्यानंतर शहरातील रस्तेकामांना काही प्रमाणात गती आली आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील पॅचवर्कची व कार्पेट सिल्ककोटची कामे सुरू केली आहेत.
कोल्हापूरच्या रस्तेकामाची दुर्दशा झाली आहे. १०० कोटींची रस्ते कामे पावसात वाहून गेली आहेत. उर्वरित रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. अन्य रस्त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. शिवाय सर्वच रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व प्रकाराबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांतर्गत रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहे.
आयटीआय ते तपोवन ते कळंबा तुरुंग, आयटीआय ते नाळे कॉलनी रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करण्यात आले. नगरोत्थान योजनेंतर्गत १०० कोटींमधून दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मुख्य रस्त्याचे पुन:पुष्टीकरण करण्याचे काम सुरू आहे. राजारामपुरी बस रूट, टेंबलाई चौक ते टाकाळा चौक, पी. एन. पाटील बंगला येथे डांबरी पॅचवर्क पूर्ण करण्यात आले. बापट कॅम्प येथे ठेकेदारामार्फत दुसरा थर सिल्क कोटचे काम सुरू करण्यात आले आहे. ट्रेड सेंटरसमोरील रस्ता महापालिकेकरवी डांबरी पॅचवर्क पूर्ण करण्यात आले आहे.
ही कामे आयुक्त के. मंजू लक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणात उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांनी करून घेतली. शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेता, यापुढे जर नवे रस्ते खराब झाले, तर संबंधित उपशहर अभियंता जबाबदार राहतील, असे स्पष्ट वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. येथे आज आयोजित बैठकीत त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंते महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, प्रोजेक्टचे सुरेश पाटील संबंधित ठेकेदार व कन्सल्टंट उपस्थित होते. आमदार क्षीरसागर यांनी दोषदायित्व कालावधीत व नवीन करण्यात येत असलेल्या रस्त्यांचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांनी कामे तातडीने व वेळेत पूर्ण न केल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच नव्याने तयार होणाऱ्या रस्त्यांचे मोजमाप, जाडी व गुणवत्ता तपासण्याची थेट जबाबदारी उपशहर अभियंत्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील पर्यटक व नागरिकांना सतत खराब रस्त्यांचा सामना करावा लागत असून, दिवाळीपूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचा आदेश आमदार क्षीरसागर यांनी शहर अभियंत्यांना दिला. भूसंपादन किंवा इतर अडचणी असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत नगररचना विभागाशी समन्वय साधून तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतुकीची वाढती समस्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.