कोल्हापूर : शासनाने राज्य महोत्सवात कोल्हापुरातील दसरा महोत्सवाचा समावेश केला आहे. तो जनोत्सव, लोकोत्सव म्हणून साजरा करावा. यासाठी नवरात्रीतील दिवसांत कोल्हापूर करमुक्त करावे, असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी येथे व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा प्रशासन, राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने येथे शाही दसरा महोत्सवाची सुरुवात झाली आहे. याचे उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज यांनी दीप प्रज्वलनाने केले. या वेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
ते म्हणाले, ‘शाही दसरा ही संकल्पना कोठे नाही. तर जन उत्सव अशी संकल्पना आहे. ग्वाल्हेर येथे दसरा उत्साहात साजरा केला जातो. तेथे नवरात्र उत्सवाचे पंधरा दिवस करमुक्त असतात. कपड्यापासून मोटारीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या खरेदीवर करआकारणी केली जात नाही. हीच पद्धत कोल्हापूरमध्येही सुरू केल्यास येथील दसऱ्या महोत्सवाला सर्वदूर प्रतिसाद वाढत राहील. त्यासाठी रस्ते, विमान यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.
म्हैसूरनंतर कोल्हापूर येथील दसरा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करून खासदार धनंजय महाडिक यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार मानून पुढील वर्षी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा समावेश करू, असे आश्वासित केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाही दसरा महोत्सवातून नवा इतिहास निर्माण करूया, असे आवाहन केले.
प्रेरणादायी गाथा शिवशंभूची
या वेळी ‘गाथा शिवशंभू’ची या सादरीकरणात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास गाणी, नाट्यमय प्रसंग, नृत्य, गोंधळ, दिंडी मर्दानी खेळ याद्वारे साकारण्यात आला. या महानाट्याचे दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले होते.