कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी कुठे रथावर स्वार होऊन तर कुठे फुलांच्या पायघड्या घालून विद्यार्थ्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. प्रसन्न वातावरणात पहिलाच दिवस गेल्याने विद्यार्थ्यांची कळी खुली होती. मे महिन्याची दीर्घ सुट्टी संपल्यानंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात यावे, असे निर्देश शालेय विभागांनी शाळांना दिले होते. नवा गणवेश, नवे सवंगडी, नवे शिक्षक अशा प्रसन्न उत्साही वातावरणात आज शाळेचा पहिला दिवस होता. नवीन वर्गात विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती.
पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सडा रांगोळ्या घालून स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोठे रथावर बसून, कोठे सजवलेल्या मोटारीतून तर कोठे अन्य वाहनातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यामध्ये परिसरातील पालखी उत्साहाने सहभागी झाले होते.
पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांचा शाळेचा पहिलाच दिवस विशेष असतो. सर्व विद्यार्थ्यांचा हा पहिला दिवस छान जावा, दिवसाची सुरुवात गोड व्हावी आणि मुलांना शहरासह जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. वाद्यांचा गजर, प्रभातफेरी असे वातावरण शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात दिसून आले.