कोल्हापूर : ऊसदराच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर बुधवारी अज्ञात शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे पुणे-बेंगळुरू या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून ऊसदरावरून साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. कारखानदारांशी झालेल्या बैठकांमधून शेतकरी संघटनांना अपेक्षित असा दर मिळत नाही. त्यामुळे ऊसदराच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांचे उसाचे कांडे देऊन स्वागत करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. मात्र, या आंदोलनाला परवानगी मिळालेली नव्हती.

आज फडणवीस कोल्हापुरात आले असता, अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या गाड्यांवर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे ते जात असलेल्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ ताफ्यासमोर पडलेल्या उसाच्या कांड्या बाजूला केल्या.

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना भूमिगत होऊन आंदोलन करण्याबाबत सुचवले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर उसाच्या कांड्या कोणी फेकल्या याचा शोध पोलीस घेत आहेत.

ऊस आंदोलकांना धक्काबुक्की

दरम्यान, चंदगड येथील पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी आंदोलन केले असता, पोलिसांनी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना धक्काबुक्की केली. त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेऊन चंदगडला नेले. त्या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गड्ड्यान्नावर यांना आंदोलनस्थळी आणले जात नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी .गड्ड्यान्नावर यांना आंदोलनस्थळी आणले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच ऊसदराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील किमान मूल्य रकमेतील थकबाकी दिलेली नाही, तसेच किमान मूल्य भावापेक्षा अल्पदर घोषित करणे हा कायद्याचा भंग असून, प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

राजेंद्र गड्ड्यान्नावर म्हणाले, की या विभागातील इको केन शुगर्स, ओलम शुगर्स, दौलत अथर्व, आजरा व आप्पासाहेब नलवडे कारखान्यांकडे २५ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी आहे. व्याजासह ही रक्कम २७ कोटी रुपये होते. ही रक्कम मिळाली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या आंदोलन केले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.