कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सध्या राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्याला दिलासा देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भात, नाचणी, सोयाबीन यांचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. यंदा भाताला २३६९ रुपये, नाचणीला ४८८६ रुपये तर सोयाबीनसाठी ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत देण्याचे निश्चित झाले आहे. याचा जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आपला माल प्रस्तावित खरेदी केंद्रावरच द्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी केले.

आधारभूत किंमत धान खरेदी योजना हंगाम २०२४-२५ चा आढावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी ते पुढे म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला हवा तसा भाव मिळत नाही. या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी केंद्रे निर्माण व्हावीत. त्यासाठी खरेदी केंद्रांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. पणन महासंघाने शेतीमालाची खरेदी करावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल याची दक्षता घ्यावी.

माजी आमदार संपत पवार यांनी आधारभूत किमतीवर धान्य खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी अशी सूचना केली. यावर पणन महासंघाचे कार्यकारी संचालक श्रीधर दुबे-पाटील यांनी खरेदी-विक्री केंद्र उभारण्याबाबत मंजुरीचे अधिकार केंद्राला असल्याचे सांगत, कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाधिक केंद्रे सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवावेत असे सुचविले. जिल्ह्यातील सर्वच खरेदी-विक्री संघांची लवकरच बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील दुर्गम-डोंगराळ भागात खरेदी संघाची स्थापना करण्यात यावी. लोकांकडून आलेल्या तक्रारींवर बोलताना त्यांनी धान्य विक्रीदरम्यान खासगी व्यापाऱ्यांकडून आर्द्रता तपासणी यंत्राद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत कडक कारवाईचे निर्देश प्रकाश आबिटकर यांनी दिले.खरीप पणन हंगाम सन २४-२५ या वर्षातील ३१ मार्च अखेर जिल्ह्यातील ११५४ शेतकऱ्यांचे सुमारे ११५०२ क्विंटल धान (भात), २९२ शेतकऱ्यांचे २६४७ क्विंटल नाचणी (रागी) तर नाफेड अंतर्गत १५३ शेतकऱ्यांचे १७५९ क्विंटल इतके सोयाबीन खरेदी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितले. गतवर्षी जिल्ह्यात धानाची आठ तर नाचणीची पाच खरेदी केंद्रे सुरू होती. शासनाच्या परवानगीनंतर जिल्ह्यात खरेदी केंद्रे सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.