कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आज अनेक गावातील शेतामध्ये शेतकऱ्यांनी तिरंगा झेंडा फडकवला गेला . तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात, या घोषवाक्यखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने हे अभिनव आंदोलन करण्यात आले. तर ग्रामसभेमध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधात ठराव करण्यात आले. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात गावोगावचे शेतकरी, महिला, युवक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गापासून बळीराजाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे अशा आकुर्डे (ता. गारगोटी) येथील दौलत शिंदे, एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथील शिवाजी मगदूम , कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले.

अभिनव आंदोनात विजय देवणे कॉम्रेड, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, माजी जि. प. सदस्य शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, यांच्यासह संजय बामणकर, भैरवनाथ ताकमारे, निवास ताकमारे, तानाजी ताकमारे, अनिल कांबळे, सदाशिव चौगले, आनंदा बनकर, सुशिला पाटील, पारूबाई म्हाकवे, राजू घराळ, आनंदा कोळेकर, रामा चव्हाण, प्रविण बिडकर, निशांत पाटील, अर्जुन इंगळे, अमन शिंदे, सागर पाटील, आण्णासो बोडके, अनिल मुळीक यांच्यासह शक्तिपीठ बाधिक शेतकरी आदी सहभागी झाले होते.

दुसरे अभिनव आंदोलन

यापूर्वी , शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करताना एका आंदोलनावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला होता. त्यावर राजू शेट्टी यांनी अशी कोणती जमीन असेल तर ती क्षीरसागर यांच्या नावावर करण्यासाठी बिंदू चौकात येत आहे, असे आव्हान देत गेल्या महिन्यात भर पावसात कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी  दोन तास थांबून राहिले होते. राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. आमदार क्षीरसागर आले नसल्याने शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या साक्षीने  बक्षिसपत्रावर सह्या करून ते  कधीही येवून घेवून जाण्याचे प्रतीआव्हान क्षीरसागर यांना दिले होते.
  
यावेळी शेट्टी म्हणाले, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेच्या पाच निवडणुका लढवल्या. माझ्याकडे असलेली गाडी लोकवर्गणीतून देण्यात आली आहे. गाडी घेण्यासाठी माझ्यावर आयआरबीच्या कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली नाही. कोणत्याही बहु उपचार रुग्णालयाच्या डॅाक्टर, विकसक, शासकीय कार्यालयातील खातेप्रमुख, औद्योगिक वसाहतीतील उद्योजकाकडून बगलबच्चांना पाठवून हप्ते गोळा करण्यासारखी परिस्थिती माझ्यावर ओढवली नाही. महापालिकेतील मोक्याच्या जागेवर आरक्षण टाकून जमिनी लाटल्या नाहीत. यामुळे राजेश क्षीरसागर यांनी माझ्या संपत्तीची कधीही चौकशी करावी, असा टोला त्यांनी लगावला होता.