कोल्हापूर : घरगुती गणरायाप्रमाणेच कोल्हापुरात यंदाही सार्वजनिक तरुण मंडळांनी पर्यावरण पूरक विसर्जन करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापुरात १ हजार ५६१ सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती तर घरगुती व लहान मंडळाच्या १ हजार २०३ गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले. सुमारे २५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.

कोल्हापुरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन, निर्माल्य दान करण्याची प्रथा पडली आहे. यावर्षी घरगुती गणेश विसर्जनाच्या वेळी सुमारे साडेतीन लाखहून अधिक गणेश मूर्तीचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले होते.अनंत चतुर्दशीसाठी पर्यावरणपूर्वक विसर्जन होण्यासाठी शहरात २२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते.

या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुके वेळी स्वयंचलित यंत्राद्वारे सार्वजनिक मंडळांनी तसेच घरगुती मंडळांनी विसर्जन केले सार्वजनिक मंडळाच्या १ हजार ५६१ व घरगुती व लहान मंडळाच्या १ हजार २०३ गणेश मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज फ्रेंड मंडळाची शेवटची गणेश मूर्तीचे रविवारी सकाळी नऊ वाजता विसर्जन करण्यात आले. यासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली होती.

निर्माल्य दानास प्रतिसाद

कोल्हापूर शहरात यंदाही निर्माल्य दान उपक्रमाला मंडळाकडून प्रतिसाद मिळाला. सुमारे २५ टन निर्माल्य संकलित करण्यात आले. हे निर्माल्य खत प्रक्रिया केंद्रासाठी पाठवण्यात आले असून त्यापासून सेंद्रिय खत बनवले जाणार आहे. या कामी महापालिकेचा आरोग्य विभाग, धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि संस्था यांच्याकडून सहकार्य करण्यात आले.