पश्चिम महाराष्ट्रात  मित्रपक्षांच्या सहभागाअभावी उमेदवारांमध्ये अस्वस्थता

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप पक्षाचा आदेश नसल्याने प्रचारात एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या दोन्ही आणि काँग्रेसच्या एका उमेदवाराकडून सध्यातरी एकाकी प्रचार सुरू आहे. ‘स्वाभिमानी’बाबत अंतिम निर्णय झाला नसल्याने तेही आघाडीच्या प्रचारापासून अलिप्त आहेत.

लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोमाने वाहू लागले आहे. उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, उमेदवार जाहीर होऊनही पश्चिम महाराष्ट्रात आघाडीत तरी अद्याप एकवाक्यता दिसत नाही. उभय काँग्रेसच्या उमेदवारांना तूर्तास एकमार्गी वाटचाल करावी लागत आहे. याउलट, युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांचा सहभाग तसेच मेळही दिसत आहे. यामुळे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत अवस्थता दाटली आहे. त्यांनी मित्रपक्षांच्या जिल्ह्य़ातील प्रमुखांकडे विचारणा केली असता पक्षाचा आदेश आला की प्रचारात सक्रिय होऊ , असे सांगितले जात आहे. मित्रपक्ष प्रचारात सामील होण्याबद्दल किंतु नसला तरी प्रदेश कार्यालयाकडून याबाबतची औपचारिकता कधी पूर्ण होणार याची चिंता उमेदवारांना लागली आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पण त्यांच्या प्रचाराला अद्याप गती आलेली नाही. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत काही बैठकाही पार पडल्या आहेत. पण, येथे अजूनही काँग्रेसची मंडळी प्रचारात नाहीत. याबाबत महाडिक यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘पक्षाचा आदेश आल्यानंतर प्रचारात सहभागी होऊ  असे उत्तर दिले आहे’, असे महाडिक, मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले होते. सातारा येथेही राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचार सुरु केला असला तरी काँग्रेसचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रणजितसिंग नाईक निंबाळकर हे सक्रिय झाले नाहीत. सांगलीमध्ये तर आघाडीकडून कुठला पक्ष आणि कोण उमेदवार हेच अजून ठरलेले नाही. हातकणंगलेत देखील अंतिम निर्णय झाला नसल्याने ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ म्हणत प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात ना उभय काँग्रेसचे लोक आहेत, ना दोन्ही काँग्रेसच्या प्रचारमंडपात स्वाभिमानीचे कार्यकर्ते. अशी ही विसंगती प्रचाराच्या पहिल्या टप्प्यावर आघाडीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे उमेदवारांना मात्र आताच चिंता भेडसावू लागली आहे.

समन्वयक नियुक्तीनंतर गती

उभय काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला नसल्याचे कारण म्हणजे समन्वयाचा अभाव असल्याची कबुली कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिली. मात्र यावर समन्वयक नियुक्ती करत एकत्रित प्रचाराला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघासाठी आमदार संग्राम थोपटे यांची निरीक्षक म्हणून नियुती झाली आहे. अशीच नियुक्ती राष्ट्रवादी, स्वाभिमानी, मित्रपक्ष यांच्याकडून केली जाईल आणि त्यानंतर  प्रचाराला गती येईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला गुरुवारी सांगितले.