कोल्हापूर : नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीसंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे लक्ष वेधले आहे. महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने छेडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक आयोजित केली आहे. याकामी आमदार राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला होता.

बैठकीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील हे खासदार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, विनय कोरे, अमल महाडिक, विश्वजित कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, राहुल आवाडे हे आमदार, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासो भगाटे, सागर पाटील, ॲड. मनोज पाटील यांना पत्रे पाठवण्यात आली आहेत.

मंत्री, खासदार वगळले

या बैठकीसाठी माजी पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार छत्रपती शाहू महाराज यांना वगळण्यात आले असल्याने त्याची चर्चा होत आहे.

राजकीय वाद

नांदणी येथील जैन मठातील हत्तिण वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आली असून तिची मालकी असलेल्या अंबानी उद्याोगसमूहाविरुद्ध संताप व्यक्त होऊ लागाला आहे. या असंतोषातूनच आता विविध पद्धतीने निषेध आंदोलने सुरू झाली असून त्यात सर्वच राजकीय पक्ष उतरल्यामुळे नांदणीच्या हत्तीचा हा विषय आता राजकीय पटलावर आला आहे. दरम्यान, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हत्ती परत आणण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे घोषित केले आहे. त्यावरून माजी पालकमंत्री, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी हत्ती परत कधी येणार हे जाहीर करा, असे म्हणत सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे.

दरम्यान, याच प्रश्नावरून नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावली. या पदयात्रेतून राजू शेट्टी यांनी उद्याोजक अंबानी आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ माजी मंत्री प्रकाश आवाडे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपचे आमदार राहुल आवाडे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोक माने या सत्ताधाऱ्यांना बोलू न देता पिटाळून लावण्याचा प्रकार घडल्याने या प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेले राजकारण आमने-सामने येण्यापर्यंत पोहोचले