कोल्हापूर : ‘पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला’ असे अभंग गुणगुणत रविवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडी झाली. माउली माउलीच्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात आणि पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले.
नंदवाळ (ता. करवीर) येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी हजारो भाविकांची रीघ लागलेली असते. याची सुरुवात येथील ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे माउलीच्या पालखी सोहळ्याने झाली. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडी सोहळ्याला चांदीच्या रथाचे पूजन होवून सुरुवात झाली. आठ बैलजोड्या, मानाचे दोन अश्व, विणेकरी, टाळकरी, भजनी मंडळे, मानदंड धरणारे मानकरी, विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी, बाल विठ्ठल, संतांची वेशभूषा केलेले छोटे वारकरी अशी शिस्तबद्ध रीतीने भजन, कीर्तन करीत दिंडी निघाली.
उभे रिंगण सोहळा
खंडोबा तालीम येथे उभे रिंगण झाले. तालमीतर्फे भंडारा उधळून पालखीचे स्वागत झाले. संकल्प सिद्धी कार्यालय येथे विसावावेळी आमदार राजेश क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्य हस्ते पालखी पूजन, प्रसाद वाटप कार्यक्रम झाला.
नेत्रदीपक गोल रिंगण
पुईखडी येथील मोकळ्या पटांगणात दोन अश्वांनी केलेला नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा हजारो भाविकांनी पुईखडी माळावर अनुभवला. मावळा न्यू नागदेवाडी यांच्यामार्फत आमदार अमोल महाडिक यांनी भाविकांना केळी वाटप केले. आमदार क्षीरसागर आणि सचिन चव्हाण यांनी रथाचे सारथ्य केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. त्यानंतर पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले.
गोकुळकडून हरिपाठ वितरण
दिंडीतील भाविकांना गोकुळच्या वतीने ५ हजार सार्थ हरिपाठ पुस्तिका तसेच सुगंधी दुधाचे वाटप गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.