कोल्हापूर: आलाबाद (तालुका कागल) ग्रामपंचायतीला २०२३ मधील ‘महिला मैत्री गाव’ ( महिला स्नेही) हा दिनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास राष्ट्रीय पुरस्कार आज जाहीर झाला. त्यांनी या मानांकनात देशात तृतीय क्रमांक पटकावला. त्याला 30 लाख रुपये मिळणार आहेत. हे वृत्त समजताच शनिवारी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. पुरस्काराचे वितरण १७ एप्रिलला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होईल.
कागल पंचायत समिती माजी सदस्य जे. डी. मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच लताताई बाबुराव कांबळे, उपसरपंच ईश्वर चौगले व सर्व सदस्यांच्या साथीने ग्रामसेवक अनिकेत पाटील यांच्या कौशल्याने व अथक परिश्रमाने महिलांसाठी आरोग्य, कौशल्यविकास करणारे विविध उपक्रम राबवले. बचत गट महिलांचे संघटन करुन त्यांना सक्षम बनवले, त्याबद्दल केंद्र सरकारकडून महिला मैत्री गाव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणारे पहिले महिला मैत्री गाव विभागातील राज्यातील पहिलेच गाव आहे. हे गाव राज्यस्तरावर प्रथम आले होते त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला.
एकूण कामात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या ही विचारात घेतली. महिला स्नेही गाव विभागातून पुरस्कार मिळाला. जलसमृद्ध, बाल स्नेही, पायाभूत सुविधा, गरिबी मुक्त, आरोग्यदायी स्वच्छ व हरित गाव महिला स्नेही अशा नऊ विभागांना स्वतंत्र पुरस्कार दिले जातात. याबाबत सरपंच लताताई बाबुराव कांबळे म्हणाल्या, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचतगट अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, गटविकास अधिकारी सुशील संसारे, विस्ताराधिकारी आप्पासो माळी यांचे मार्गदर्शन मिळाले.
महिलांसाठी उल्लेखनीय उपक्रम
ग्रामपंचायतने महिलांसाठी आरोग्य शिबिरे कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उपाययोजना केल्या बचत गटाच्या माध्यमातून शेळीपालन, शिलाई मशीन, दुभती जनावरे, किराणा दुकान, पिठाचे गिरणी उभारायला मदत केली.