कोल्हापूर : दिवाळी सणाची लगबग बाजारात वाढली असताना मंगळवारी येथील गंगावेश भागातील बाजारपेठेत मोटार घुसल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन महिला गंभीर झाल्या आहेत.

गंगावेश भागातील शाहू उद्यान परिसरात भाजी बाजार भरतो. कोल्हापूर परिसरातील खेडोपाड्यातून शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आणत असतात. या परिसरात ग्राहकांचा राबता असतो. दिवाळीचा सण असल्याने बाजारपेठेत गर्दी अधिकच वाढली होती.

येथे प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारी असतात. या गाड्या क्रमाने लावल्या जातात. एका गाडीला रांगेत उभी करण्यासाठी गाडीचा चालक तेथे नसल्याने रिक्षाचालक मित्राने मोटार चालू केली. या चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ती बाजारात घुसली. यामध्ये सुशीला कृष्णा पाटील ( वय ८२, रा. असूर्ले ) या महिलेचा मृत्यू झाला तर बेबीताई हिंदुराव पाटील (वय ७२, देवाळे करवीर) व गंगुबाई मोरे (वय ५५, कोगे करवीर ) या दोघी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा केला. अपघातानंतर चालक पसार झाला.