कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा वेग कायम आहे. पावसाची संततधार सुरू राहिल्याने यंदाच्या हंगामात पंचगंगा नदी आज मंगळवारी पाचव्यांदा पात्राबाहेर पडली. पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. तर, कोल्हापूर शहरात संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन पूर नियंत्रणाच्या कामाला लागले आहेत.
पावसाचा जोर वाढल्याने आज मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी महापालिका आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निवारा केंद्राची पाहणी केली. दसरा चौक येथील चित्रदूर्ग मठ या ठिकाणच्या निवारा कक्षाची पाहणी करुन परिसरात साफ-सफाई व इतर अनुषंगिक व्यवस्था करण्यात आली आहे. या अनुषंगाने सर्व संबंधितांना दक्ष राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. यावेळी सहा.आयुक्त, मुख्य आरोग्यनिरिक्षक, सामाजिक विकास विशेष तज्ञ व आरोग्य स्वच्छता विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या चार – पाच दिवसांपासून जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सतत सुरू आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . काही ठिकाणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे राज्य रस्ते बंद आहेत तर काही ठिकाणी नद्या ,ओढे आणि .नाले यांच्या पात्राबाहेर पाणी आले आहे .आज पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर आली .
दुपारी बारा वाजताच्या दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३६ मीटरवर पोहचली आहे . तर जिल्ह्यात एकूण ८० बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. पंचगंगा नदीची ३९ इशारा तर ४३ मीटर इतकी धोक्याची पातळी आहे . पावसाचा जोर आणखीन वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही .आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे , असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या ८० बंधारे पाणीखाली गेले आहेत तर काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आज दुपारी १२ वाजता पंचगंगा नदी ३६ फुटावर होती. नदीची इशारा पातळी ३९ फुट असून धोका पातळी ४३ फुट आहे.
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरणाची पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज मंगळवारी सकाळी१० वाजता धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. एकूण २० हजार घनफूट प्रतिसेकंद विसर्ग होणार असून या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढणार आहे. पावसाचे प्रमाण व धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. सध्या जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ८ फुटांवरून ९ फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. धरणातून ६५ हजार ६०० क्युसेक आणि विद्युत गृहातून २ हजार १०० क्युसेक्स विसर्ग, असे एकूण ६७ हजार ७०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वारणा धरणातून ३० हजार क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.