कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वृक्षसंपदेचा अभ्यास करताना वनस्पती अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना हॉर्स बूश अर्थात पांढरा चिकटा हा छोटेखानी वृक्ष मंगळवार पेठेतील दत्त कॉलनी येथे प्रकाश चव्हाण यांच्या घराजवळ आढळून आला. चव्हाण यांनी दोन वर्षापूर्वी नर्सरीमधून हा छोटेखानी वृक्ष आणून लावला होता.

हा वृक्ष डॉ. ऐतवडे यांनी सायबर कॉलेजमध्ये देखील पाहिल्याचे सांगितले आहे. हा वृक्ष मूळचा ऑस्ट्रेलिया खंडातील असून तो आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक आयलँड्स या भागातही पाहावयास मिळतो. हॉर्स बूश या वृक्षाचे शास्त्रीय नाव डेन्ड्रोलोबीयम अंबेल्याटम असे आहे. डेन्ड्रोलोबीयम या जातीचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. डेन्ड्रॉस म्हणजे ट्री अर्थात वृक्ष आणि लोबीयम म्हणजे शेंगाधारी. याच्या प्रजातीस उच्छत्र (अंबेल) प्रकारच्या फुलोऱ्यावरून अंबेल्याटम हे नाव दिले गेले आहे. पांढरे फुल असलेल्या या झाडाच्या च्या शेंगा कपड्यांना चिकटतात त्यामुळे पांढरा चिकटा असे स्थानिक नाव पडले असावे. जगभरात डेन्ड्रोलोबीयमच्या सुमारे १८ प्रजाती पहावयास मिळतात. त्यापैकी डेन्ड्रोलोबीयम अंबेल्याटम हि एकमेव प्रजात समुद्रकिनारी वाढणारी आहे.

हेही वाचा : शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा लागेल, हसन मुश्रीफ यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा; व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल

कसा असतो वृक्ष?

या वृक्षाची नोंद महाराष्ट्र राज्याच्या वनस्पती कोशामध्ये असून कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्ये याची नोंद नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रथमच पांढरा चिकटा या वृक्षाची नोंद होत आहे. हा वृक्ष साधारणपणे ९ ते १२ फूट उंच वाढतो. याची साल राखाडी रंगाची असते. या झाडाची पाने पोपटी रंगाची आणि संयुक्त असून ती त्रिपर्णी असतात. टोकाकडील पर्णिका अंडाकृती असून बाजूच्या दोन पर्णिका थोड्या निमुळत्या असतात. फुलोरा पानांच्या बेचक्यात येत असून फुले पांढऱ्या रंगाची करंजीच्या फुलांप्रमाणे असतात. फुले १ ते १.५ सेमी आकाराची असतात. याची शेंग मालाशिंबा (मण्यांच्या माळेप्रमाणे दिसणारी) प्रकारची आणि दोन्ही बाजूने चपटी व वक्र असते. ३ ते ४ सेमी लांब असेलली हि शेंग पक्व झाल्यावर तिचे सुट्या मण्यासारखे ४ ते ५ एकबीजी तुकडे सांध्यातून अलग होतात. बिया किडनीच्या आकाराच्या असून त्या गडद चॉकलेटी ते काळ्या रंगाच्या असतात. या वृक्षाला वर्षभर फुले-फळे पहावयास मिळतात.

हेही वाचा : शालेय पोषण आहारात यंदापासून १५ लज्जतदार पदार्थ

उपयोग कोणते?

पांढरा चिकटा या झाडाचा उपयोग शोभेसाठी होतो. याचे लाकूड टणक आणि टिकाऊ असते. लाकडाचा उपयोग छोटे खांब बनविण्यासाठी आणि इंधन म्हणून होतो. समुद्र किनारे तसेच वाळूच्या ढीगच्या बाजूला धूप नियंत्रणासाठी आणि लागवडीच्या संरक्षणासाठी या वृक्षाचा उपयोग होतो. हा वृक्ष औषधी गुणांचा असून त्याचा उपयोग ताप, मलेरिया, डोकेदुखी, प्लिहावृद्धी इ. मध्ये होतो. या झाडामध्ये सूक्ष्मजीवप्रतिबंध गुणधर्म आढळले आहेत.

हेही वाचा : विनोद तावडे आणखी मोठे होतील – चंद्रकांत पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जतन, संवर्धन सोपे

कोल्हापूर शहरातील वृक्षगणना होणे गरजेचे आहे. त्यातून दुर्मिळ वृक्षसंपदा व वारसा वृक्ष कोणकोणते आहेत ते माहित होईल. याबरोबरच अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बिया गोळा करून त्यांची रोपे तयार करता येतील आणि योग्य त्या ठिकाणी ती लावता येतील. अशा प्रकारे त्यांचे जतन आणि संवर्धन करणे सोपे होईल.

डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे,(वनस्पती अभ्यासक)