कोल्हापूर : ऊस दर प्रश्न मार्ग निघावा यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आजी-माजी पालकमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य करीत ऊस आंदोलन चिघळवणारे हे दोघे खरे सूत्रधार आहेत, अशी टीका केली.
ऊस दर मागणी प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. दसऱ्यापासून साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची तयारी केली असली तरी आंदोलनामुळे गाळप ठप्प झाले आहे. तर हा प्रश्न मिटवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत एक बैठक घेतली होती. मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता.
समिती म्हणजे फार्स
यावर आता शेट्टी यांनी २३ नोव्हेंबर पासून पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुल येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे आज घोषित केले. चर्चा, बैठका यातून काहीही निष्पन्न होत नाही. त्यामुळे जे व्हायचे ते आता मैदानातच होईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या समिती ही शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती म्हणजे एक फार्स आहे. या समितीवर पालकमंत्री मुश्रीफ यांचा दबाव असून आहे. जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांच्या ताटाखाली मांजर बनले आहे. मार्च २०२३ मध्ये नमूद केलेलया साखर मूल्यांकनामध्ये प्रचंड घोळ आहे, असा आरोप त्यांनी केला.
कारखानदारांवर दबाव
ऊस दर दराबाबत मार्ग काढण्यासाठी दोन- तीन साखर कारखानदार चर्चेसाठी पुढे आले होते. परंतु त्यांच्यावर हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी दबाव टाकला. ऊस आंदोलन मोडण्यासाठी कारखानदार सरकार विरोधी पक्ष हे एकत्र असले तरी आम्ही मागे हटणार नाही. पालकमंत्री मुश्रीफ हे मार्ग काढण्या ऐवजी साखर कारखानदारांची उघड बाजू घेत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी पक्षाचे राज्य अध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राजेंद्र गड्ड्यांनावर, सावकार मदनाईक, वैभव कांबळे, सागर शंभूशेट्टी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.