कोल्हापूर : ऊसदराच्या मागणीबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे सोमवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय न झाल्यास बुधवारी (पाच नोव्हेंबर ) मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे कोल्हापुरात उसाचे कांडे देऊन स्वागत करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.७ नोव्हेंबर रोजी निगवे ( ता. करवीर) येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांगली कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. ऊस आंदोलकांना मारहाण झाली आहे. याचा निषेध करीत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलताना शेट्टी म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदार एकत्रित येऊन उसाला प्रतिटन ३४०० ते ३४५० पर्यंत पहिली उचल देत असून ती मान्य नाही. ऊस परिषदेत केलेल्या ३७५१ रुपयांबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यासोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी तोडगा काढावा अशी अपेक्षा होती. राज्य सरकार व साखर कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफआरपी जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व शेतकरी संघटना, कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली आहे.
गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षी सुध्दा साखर, इथेनॅाल, मोलॅसिस, बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व उतारा चोरीतून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरुवातीस कारखानदारांनी गुंडाकरवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी उसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल.
प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला तर राज्याचे मुख्यमंत्री ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तयारी करावी. त्याबरोबरच ७ नोव्हेंबर रोजी निगवे ता. करवीर येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
