कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या दळभद्री कारभारामुळे आजही शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. कोल्हापूरकरांचा गणेशोत्सवाचा पहिला दिवस कोरडा राहिला. सणासुदीला त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तातील टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागले.

महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा तोकडी असल्याने पुण्याहून यंत्रसामग्री मागवण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठ्याच्या या निष्क्रिय कारभारावर नागरिकांत संताप होऊ लागल्यावर आता अधिकारी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात दिसू लागले आहेत.

कोल्हापूरला या आठवड्यात पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागला आहे. एकीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना त्यासाठी स्वच्छतेकरिता पाण्याची गरज अधिक असते. गेल्या रविवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. अद्यापही शहराच्या काही भागाला पाच दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

आश्वासन फोल

काळम्मावाडी येथील पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे काल महापालिकेकडून सांगण्यात आले होते. बुधवारी पहाटे चौथ्या चाचणी दरम्यान दोष उद्भवल्याने ते आश्वासन फोल ठरले.

पुणे महापालिकेवर भिस्त

अशातच महापालिकेकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज पुणे महापालिका प्रशासक नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून संपूर्ण क्रोबार असेंब्ली संच, तसेच तज्ज्ञ तंत्रज्ञ पाचारण केले. या पथकाकडून काम पूर्ण झाल्यावर पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नवे आश्वासन महापालिकेने दिले आहे.

पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिका, खासगी अशा २८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मनपा अधिकाऱ्यांना सुटीच्या दिवशी रस्त्यावर उतरवले आहे. पोलीस बंदोबस्तासह टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे.

टँकरवाल्याचा सावळा गोंधळ

कोल्हापूरला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात महापालिका असमर्थ ठरली असताना, दुसरीकडे काही भागांत राजकीय दांडगाईमुळे मुबलक प्रमाणात टँकर उपलब्ध होत होते. तेथील लोकांना पाणी मिळत आहे. इतर भागांमध्ये अपुऱ्या प्रमाणात टँकर पोहोचत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी ऐन गणेशोत्सवात वणवण भटकावे लागत आहे.

नागरिक संतप्त

दरम्यान, सलग पाच दिवस पाणीपुरवठा न झाल्याने शहरातील महिला रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. रात्री तपोवन, एलआयसी कॉलनी परिसरातील महिला व नागरिक संतप्त झाले . त्यांनी गारगोटी – कोल्हापूर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. यामुळे गणेश उत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूर गारगोटी मार्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.