रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष तथा राज्यसभा सदस्य रामदास आठवले यांनी मंगळवारी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महापालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमून कार्यकर्त्यांनी साखर-पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. आठवले आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी पक्ष फटाके फोडले.
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या १९ मंत्र्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यामध्ये आठवले यांचा समावेश आहे. त्यांचा समावेश होणार याची माहिती बातम्यांद्वारे कार्यकर्त्यांना अगोदरच समजली होती. त्यामुळे बहुतेक कार्यकर्त्यांनी व वृत्तवाहिनीवर त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पहिला. त्यानंतर दुपारी कार्यकत्रे महापालिका चौकात जमले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घातला. फटाके फोडून तसेच वाहनधारक, पादचारी यांना साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास आठवले यांच्या मंत्रिपदामुळे दलितांसह सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लागतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. पक्षाचे प्रदेश सचिव मंगलराव माळगे म्हणाले, डॉ. आंबेडकर हे पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला केंद्रात मंत्रिपद मिळाले नव्हते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही संधी आठवले यांना दिली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आठवले यांनी भरीव कामगिरी केली होती. तशीच मोलाची कामगिरी बजावताना मागासवर्गीय तरुणांना नोकरी, रोजगार यासह विकासात्मक काम ते नक्की करतील, असा विश्वास आहे.