‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष व कागलचे युवा नेतृत्व समरजितसिंहराजे घाटगे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षां निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कागल शहरात त्यांच्या या पक्षप्रवेशाचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व साखर-पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले.
या पक्षप्रवेशा वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रक्रांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके उपस्थित होते. प्रवेशानंतर फडणवीस यांनी समरजितसिंह घाटगे यांचे स्वागत केले, या वेळी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत प्रवीणसिंह घाटगे, श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे, श्रीमंत नवोदिता घाटगे, रमेश जाधव व डॉ. स्वप्निल भोसले आदि कुटुंबीयही उपस्थित होते.
घाटगे यांच्या भाजपा प्रवेशाचे कागल शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यामध्ये महिला कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या होत्या. घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी गबी दर्गा येथे गहिनीनाथ, गबीपीराचे दर्शन घेतले. त्यानंतर राम मंदिरामध्ये येऊन घाटगे घराण्याचे कुलदैवत असलेल्या प्रभू रामाचे दर्शन घेतले. बसस्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या व श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.