कोल्हापूर : …तर हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते, अशी शक्यता संजय राऊत यांनी पुस्तकातून व्यक्त केली आहे. राऊत यांच्या पुस्तकावर महायुतीवर टीकेचे प्रहार होत असले तरी कागल विधानसभा मतदारसंघातील मुश्रीफ समर्थक मात्र राऊत यांच्या लेखनाने सुखावून गेले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. गेल्या वर्षी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने अटक केल्यानंतर शंभर दिवसांच्या तुरुंगवासात त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकामध्ये महाविकास आघाडीची स्थापना तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर व भाजपवर अनेक गंभीर आरोप राऊत यांनी केले आहेत. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी मुंबईत होत आहे.
दरम्यान, या पुस्तकात राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासंबंधी एक परिच्छेद लिहिलेला आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक १०२ वर राऊत यांनी लिहिलेले आहे, ‘‘महाविकास आघाडी सरकारचे बाळंतपण साधे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या. अजित पवार पहाटेचा शपथविधी आटोपून रिक्त हस्ते पुन्हा स्वगृही परतले होते. त्यांचा विचार होईल, असे मला वाटले नव्हते. छगन भुजबळ हे तुरुंगातून सुटून आले तरी त्यांच्यावर खटले चालू होते.
भुजबळ यांची गृहमंत्री होण्याची इच्छा प्रबळ होती. त्यांच्यात क्षमताही होती पण त्यांच्या तुरुंग प्रवासाची अडचण ठरली असावी. जयंत पाटील यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी नकोच होती. ‘तो एक थँकलेस जॉब आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते. वळसे-पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी होत्या. कोल्हापूरचा हसन मुश्रीफ हा एक रांगडा व तगडा गडी. मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु ते मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना ‘टार्गेट’ केले जाईल, अशी भीती पवारांना वाटली. खरं तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेले कार्यकर्ते. पण शेवटी धर्म आडवा आला. ” असे राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.
राऊत यांची ही शक्यतेची कहाणी हसन मुश्रीफ समर्थकांना भलतीच आवडली आहे. अनेक मुश्रीफ समर्थकांनी राऊत यांच्या पुस्तकातील संबंधित पान व त्यावरील मजकूर समाज माध्यमात अग्रेषित करून एक प्रकारे आनंद व्यक्त केला आहे. त्यातून मुश्रीफ हे गृहमंत्री पदाच्या योग्यतेचे असल्याचे दर्शवण्याच प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे.