कोल्हापूर : अजूनही नरेंद्र मोदी यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे खात्री नाही. भाजपच्या विरोधात निकाल राहील असा निष्कर्ष अनेक
सर्वेक्षणातून सांगितला जात आहे. महाविकास आघाडीला राज्यात ५० टक्के जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे असल्याने भाजप ईडी, सीबीआयचा वापर करीत आहे. मोदी है तो मुमकिन है असे भाजपचे कार्यकर्ते सांगत असले तरी तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला होता. आज सकाळीही त्यांनी पुन्हा विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका व्यक्त केली.

हेही वाचा – सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांची नाकेबंदी सुरू; शरद पवार यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच एका सभेमध्ये विरोधकांवर निशाणा साधताना शरद पवार यांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचे असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी सुप्रिया सुळे या लोकसभेमध्ये काम पाहतात. संसदेत काम करतात हे अमित शहा यांना माहीत असले पाहिजे. भाजपमध्ये एका कुटुंबात दोन पदे किती आहेत याची मी यादी देतो, असा पलटवार पवार यांनी केला.

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणे हे इतरांसाठी आश्चर्यकारक असले तरी मला मात्र त्यात काहीच आश्चर्य वाटत नाही, असा उल्लेख करून पवार म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांतील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. तेव्हाच चव्हाण यांना ही एकप्रकारे दिलेली धमकी आहे हे आम्हाला दिसून आले. या गोष्टीचे काहीतरी परिणाम होतील, असे वाटले होते. तेच पुढे घडले.

हेही वाचा – लोकसभा स्वतंत्रपणे लढणार – राजू शेट्टी; शरद पवार कोल्हापुरात असताना घोषणा

मराठा समाजाला शिक्षण नोकरीत आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहे. विरोधाला विरोध नको म्हणून ते मंजूर केल्याचे दिसते. याबाबत कायदा सल्लागारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. त्या माझ्याही मनात आहेत, असा पुनरुच्चार पवार यांनी आज केला.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. बहुतांश जागांवर एकमत झाले आहे. काही ठिकाणी तिढा आहे. तो दूर केला जात आहे. जागावाटप कोणत्या मतदारसंघात झाले आहे हे मी सांगू शकत नाही. याबाबतच्या चर्चेमध्येही स्वतः सहभागी नाही. आमच्या पक्षाकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून नाना पटोले, शिवसेनेकडून संजय राऊत यांचा सहभाग आहे. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे, असे पवार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया आघाडीतील पक्षांनी एकत्रित काम करावे, अशी आमची भूमिका आहे. प्रत्येक राज्यात संबंधित पक्षांनी चर्चा करावी. काही ठिकाणी जागावाटपावरुन वाद सुरु आहे. त्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, माकप आणि काँग्रेस हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक पक्ष आहेत. अशा समस्या आम्ही अद्याप हाताळलेल्या नाहीत. सध्या जिथे शक्य आहे तेथे इंडिया आघाडीतील पक्षांनी जागावाटपाची चर्चा संपवली पाहिजे. जिथे वाद असतील तिथे वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करावी असे आमचे धोरण आहे असे पवार यांनी सांगितले.