कोल्हापूर : नांदणी मठातील महादेवी हत्ती परत करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रविवारी नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मूक पदयात्रा काढली. यामध्ये हजारो नागरिक, जिल्ह्यासह राज्यातील जैन समाज, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

नांदणी मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती गुजरातमधील वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. वनताराचे व्यवस्थापन असलेल्या उद्योगपती अंबानी यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकला जात आहे. याचा पुढचा भाग म्हणून आज ही पदयात्रा भगवान महावीर जयंती उत्सव समिती इचलकरंजी, समस्त जैन बांधव यांच्या वतीने राजू शेट्टी यांनी काढली.

एक रविवार महादेवीसाठी

पहाटे नांदणीपासून सुरू झालेली पदयात्रा कोल्हापूर – सांगली महामार्ग, पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेशली. ताराराणी पुतळा मार्गे ती जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर तेथे महादेवी (माधुरी) परत करा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

पदयात्रेतील नागरिकांनी माधुरी परत करा, एक रविवार माधुरीसाठी, जिओ बहिष्कार असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

रिलायन्स मॉलवर बहिष्कार

यावेळी राजू शेट्टी यांनी धार्मिक कार्यात महत्त्व असलेला, जिव्हाळ्याचा विषय असलेला महादेवी हत्ती परत करावी ही मागणी आहे. त्यासाठी जिओवर बहिष्कार हे पहिले पाऊल टाकले आहे. यापुढे रिलायन्स मॉलवर देखील बहिष्कार टाकू. वनतारा केंद्र हेच बेकायदेशीर आहे, असा आरोप केला. आमच्या मागण्यांबाबत राष्ट्रपतींच्या नावाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चक्क सोन्याचा हत्ती

पदयात्रेमध्ये काही लोकांनी सोन्याचा हत्ती आणून माधुरी परत करण्याच्या मागणीकडे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.