कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे. वाढलेली महागाई , नैसर्गिक आपत्ती , खतांचे वाढलेले दर , सरकारचे शेतीमालाच्या चुकीचे आयात- निर्यात धोरण , रासायनिक खते , बि-बियाणे ,किटकनाशके ,शेती औजारे याच्या माध्यमातून जी. एस. टी चा शेतक-यावर पडलेला बोजा यामुळे कर्जाचा डोंगर वाढल्याने शेतीतून लोक बाहेर पडू लागले आहेत. यामुळे सरकारने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या गहुली ता. पुसद (जि. यवतमाळ) या जन्मगावातून त्यांना अभिवादन करून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरवात करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही देशामध्ये शेतक-यांच्या आत्महत्या वाढूच लागल्या आहेत. ज्या यवतमाळ जिल्ह्याने राज्याला हरितक्रांतीचा नारा दिला त्याच जिल्ह्यात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. यामुळे राज्यात कर्जमुक्ती आंदोलनाचा डांगोरा पिटारून शेतक-यांच्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घेऊन ते सर्व अर्ज राष्ट्रपतींना निवेदन देवून कर्जमुक्तीचे आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही सरकारने या गोष्टीबाबत गांभीर्याने निर्णय घेतला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. हेही वाचा : शक्तीपीठ महामार्गातील हुजूर कोण; आमदार सतेज पाटील यांचा सवाल कांदा निर्यातीवर बंदी घातली कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला, बाहेरच्या देशातून सोयाबीन पेंड व पामतेल आयात केल्याने सोयाबीनचे दर पडले सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला, दुध पावडर आयात केल्याने दुधाचे भाव कमी झाले आहेत , सरकारने मक्का आयात करू लागल्याने मक्याचे दर ढासळले यामुळे मक्का उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला, साखर निर्यातीवर बंदी घातल्याने प्रति टनास ८०० रूपयाचा ऊस उत्पादक शेतक-यांचा तोटा झाला आणि यामुळेच शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. हेही वाचा : पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण बनविणा-या शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतक-यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून उत्पादन खर्चावर आधारित दिडपट हमीभाव द्यावा लागेल. पिकांचा हमीभाव ठरविला जात असताना सरकारने वास्तव खर्चाचा अहवाल सादर केल्यास शेतकरी आत्महत्यांचे गुढ उलगडले जाईल. यावेळी स्वाभिमानीचे डॅा. प्रकाश पोपळे , युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले, वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक , स्वाभिमानीचे विदर्भ प्रवक्ता मनिष जाधव , हणमंत राजुगोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे , पुसद तालुकाध्यक्ष गहुलीचे सरपंच नितीन कोल्हे उपसरपंच विलास आडे यांच्यासह ग्रामस्थ ऊपस्थित होते.