कोल्हापूर : वाठारकरांच्या एकजुटीपुढे गावातील शिक्षण संस्थेच्या चालकास नमावे लागले. गावातील पाच एकर भूखंड परत करण्यास तयारी असल्याची कबुली या संस्थाचालकाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत दिली.
वाठार तर्फे वडगाव (ता. हातकणंगले) येथील गायरानातील दहा एकर जमीनपैकी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ही जागा माने शिक्षण संस्थेने बळकावण्याचा आरोप करून या विरोधात गावकऱ्यांनी गेल्या महिन्यात जोरदार आंदोलन छेडले होते. या विषयावर ग्रामस्थांची एकजूट वाढत चालली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे झालेल्या बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार राजीव आवळे आदींसह ग्रामस्थांनी भूमिका मांडली.
लोकभावनेपुढे माघार
लोकभावना तीव्र असल्याने समन्वयातून तोडगा काढण्यासाठी संस्थेने स्वतःहून जागा परत करण्याचे आवाहन खासदार माने यांनी
केल्यावर त्यांना अन्य लोकप्रतिनिधींनी सहमती दर्शवली. त्यावर या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने यांनी गावाला भूखंड परत द्यायला तयार असल्याची कबुली दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकजुटीचा विजय झाल्याचे म्हणत आनंदोत्सव साजरा केला.
आजी-माजी आमदारांत वाद
ही बैठक वाठार येथील भूखंडबाबत असताना हा विषय माजी आमदार राजू आवळे यांनी अशोक माने यांच्या संस्थेने सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेने कोल्हापुरातील मराठा समाजाची जागा कशासाठी घेतली या मुद्द्यावर ताणवली. त्यावर माने यांनी तो मुद्दा इथे काढू नका. शासनाने ती रीतसर जागा दिल्याचे प्रत्युत्तर दिल्याने हा वाद चर्चेत राहिला.
आंदोलनाची पार्श्वभूमी
ही जागा गावकऱ्यांना भूखंड देण्यासाठी ठेवली असता ती गायरानातील दहा एकर जमीनपैकी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक शिक्षणसंस्था चालकांनी राजकीय वरदहस्ताचा वापर करत लाटल्याचा आरोप संरपंच सचिन कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक पाटील, अतिक्रमण विरोधी समितीचे प्रमुख राजहंस भुजंगे यांनी केला होता. या विरोधात गेल्या महिन्यात गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार पूर्णतः बंद होते. गावकऱ्यांनी पुतळ्याची धिंड काढत महामार्ग चौकात जाळला. सातबारा पत्रका वरील नाव कमी न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा सरपंच, सदस्यांनी दिला होता. उपसरपंच अश्विनी कुंभार, वारणा दूध संघ संचालक महेंद्र शिंदे, राहुल पवार, माजी सरपंच नारायण कुंभार, महेश कुंभार, बाबासाहेब दबडे, संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.