कोल्हापूर : राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीच्या महिलांच्या तिकीट आकारणीमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वडाप चालक चिंतेत पडले आहे. त्यांचा व्यवसाय निम्म्याने घटणार असून नवे प्रवासी मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

  राज्य शासनाच्या या निर्णयाचा मोठा परिणाम खाजगी वाहतूक करणाऱ्या तसेच शेअरिंग वाहतूक करणाऱ्या वडापचालकांवर होणार आहे. जिल्हात राधानगरी शाहूवाडी, भुदरगड तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम  , दक्षिण भागामध्ये खाजगी जीप, रिक्षा याद्वारे वडाप वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते.

  एसटी व वडाप तिकीट एक सारखेच आहे. आता एसटीमध्ये ५० टक्के सवलत मिळत असल्याने महिला लालपरीचा आधार घेणार आहेत. परिणाम वडाप चालकांचा ग्राहकांचा मोठा आधार तुटला असल्याने त्यांना चिंता लागून राहिली आहे.

महिलांकडून स्वागत

 एसटीच्या तिकीट आकाराने ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. राज्य परिवहन सेवेचा लाभ घेणाऱ्यामध्ये महिलांची संख्या सुमारे ४० टक्केहून अधिक आहे. यामुळे या निर्णयाचा लाभ नोकरी व्यवसाय, व्यापार या निमित्ताने प्रवास करणाऱ्या महिलांना होणार आहे.

 एसटीच्या प्रवासामध्ये निम्मी सवलत दिल्यामुळे महिला बचत गटांना मोठा आधार मिळाला आहे. बचत गटाच्या कामासाठी, वस्तू विक्रीसाठी नेहमी प्रवास करावा लागतो. आता हा प्रवास कमी खर्चात होणार असल्याने या निर्णयाचा महिलांना नक्कीच लाभ होईल, असे शहापूर येथील वीरता बचत गटाच्या अध्यक्षा शालन खोत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 नोकरीच्या निमित्ताने शासकीय, निमशासकीय, खाजगी सेवेतील महिला एसटीने प्रवास करीत असतात. शासनच्या निर्णयामुळे महिलाच्या प्रवास खर्चात मोठी बचत होणार आहे. ही बचत घर कामासाठी तसेच गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे स्वप्नाली माडकर यांनी सांगितले.