कोल्हापूर : वारणा दूध संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ चोखंदळ ग्राहकाच्या पसंतीस उतरले आहेत. त्याआधारे पुण्यात दुग्धपदार्थ विक्रीचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सांगितले.
वारणा दूध संघाच्या पुणे येथील शाखेचे ऑनलाईन उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. कोरे म्हणाले, वारणा संघाची मुंबई व उपनगरांत विक्रीसाठी १९८४ पासून शाखा कार्यरत आहे. पुणे येथे ती नसल्यामुळे विक्री करिता मर्यादा येत होत्या. विक्री वाढीच्या धोरणात्मक निर्णयानुसार शाखा चालू करण्याचा निर्णय घेतला असून, ग्राहकांना तत्परतेने सेवा देता येणे शक्य झाले आहे.
वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव म्हणाले, आगामी काळात वितरणाचे जाळे अधिक मजबूत करण्यात येईल. पुण्याचा भौगोलिक, औद्योगिक विकास तसेच लोकसंख्या वाढत असल्याने वारणेच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणी व पुरवठा समन्वय साधणे आता शक्य झाले आहे, असे संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
वारणा बँकेचे संचालक प्रमोद कोरे, संघाचे संचालक शिवाजी कापरे, अभिजित पाटील, विपणन व्यवस्थापक अनिल हेर्ले, मुंबई विपणन व्यवस्थापक ए.के. सिंग, अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.