कोल्हापूर : पलूस येथील यश अजित यादव या युवकाचा इचलकरंजी येथील नामांकित अशा श्रद्धा ॲकॅडमीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमागील सत्य उघडकीस यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे.
यश यादव यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार कदम म्हणाले, की यश यादव हा अभ्यासात, क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेला होतकरू विद्यार्थी होता. उच्च शिक्षणासाठी तो इचलकरंजीतील खासगी श्रद्धा ॲकॅडमीत दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामागे नेमके कारण काय होते, हे शोधणे गरजेचे आहे.
अशा घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करतात. त्यामुळे यशच्या मृत्यूच्या घटनेची पूर्ण चौकशी करण्यात यावी. त्यामागे कोणताही हलगर्जीपणा, अत्याचार, मनस्ताप अथवा दुर्लक्ष असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. डॉ. कदम यांनी यादव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी ते त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. त्यांनी प्रशासनाकडे लेखी स्वरूपात सखोल चौकशीची मागणीही केली आहे.