पाहुण्या ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेत इंग्लंडला २-१ने पराभूत करत विजय मिळवला. जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बिलिंग्स, वोक्सची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियापुढे ३०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल आणि कॅरी यांनी दमदार शतकं ठोकत संघाला विजय मिळवून दिला. धडाकेबाज खेळ करणाऱ्या मॅक्सवेलला सामनावीर व मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

इंग्लंडने तिसऱ्या वन डे सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दोन चेंडूत जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांचे बळी गमावले. मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला झेलबाद केले. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारताना त्याने गलीमध्ये झेल दिला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार जो रूटदेखील इनस्विंग चेंडूवर बाद झाला. त्याने टाकलेला चेंडू रूटला समजण्याआधीच पायावर आदळला आणि तो पायचीत झाला. त्यामुळे इंग्लंडची अवस्था २ बाद शून्य धावा अशी झाली होती.

पहिला बळी-

दुसरा बळी-

त्यानंतर जॉनी बेअरस्टोने एकहाती खिंड लढवली. त्याने १२६ चेंडूत ११२ धावा केल्या. त्यात १२ चौकार आणि २ षटकार समाविष्ट होते. बेअरस्टो बाद झाल्यावर खालच्या फळीतील सॅम बिलिंग्स (५७) आणि ख्रिस वोक्स (नाबाद ५३) यांनी दमदार फलंदाजी करत संघाला त्रिशतकी मजल मारून दिली. स्टार्क आणि झॅम्पाने तीन-तीन बळी टिपले.

३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ठराविक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांची अवस्था ५ बाद ७३ अशी झाली होती. पण त्यानंतर अलेक्स कॅरी आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी तब्बल २१२ धावांची भागीदारी केली. दोघांनाही दमदार शतकं झळकावली. कॅरीने ७ चौकार व २ षटकारांसह १०६ धावा केल्या, तर मॅक्सवेलने ४ चौकार आणि ७ षटकारांसह १०८ धावा केल्या. त्यानंतर २ चेंडूंचा खेळ शिल्लक राखून मिचेल स्टार्कने संघाला विजय मिळवून दिला.