सध्या भारतासह संपूर्ण जगभरात करोना विषाणूने विळखा घातलेला आहे. भारताचा पारंपरिक शेजारी पाकिस्तानातही करोना विषाणूमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रत्येक देशात नागरिक आपलं सामाजिक भान ओळखत गरजू व्यक्तींना मदत करत आहेत. अनेक उद्योगपती, खेळाडू, कलाकार करोनाविरुद्ध लढ्यासाठी मदतनिधीही उभारत आहेत. अशा परिस्थितीत करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

“सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने करोनाविरुद्ध लढ्यात वापरावा.” शोएब पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

याआधीही शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका पुन्हा खेळवली जावी अशी मागणी केली होती. सध्या लॉकडाऊनच्या काळात बहुतांश जनता ही घरात बसून आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ही मालिका खेळवली गेल्यास याला प्रतिसादही चांगला मिळेल. ही वेळ मालिका खेळवण्यासाठी योग्य नाही, पण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर दुबई सारख्या त्रयस्थ ठिकाणी हे सामने खेळवले जाऊ शकतात. खेळाडूंच्या प्रवासासाठी वेगळी सोयही केली जाऊ शकते. यामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्यास मदत होईल असंही शोएब अख्तरने नमूद केलं.