वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या ५०० व्या बळीची नोंद केली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केली. परंतू सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला ब्रॉडने पायचीत पकडत आपला ५०० वा बळी घेतला. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी घेणारा ब्रॉड हा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

ब्रॉडच्या या कामगिरीमुळे विंडीजविरुद्ध कसोटी सामन्यात एक अनोखा योगायोग जुळून आला आहे. ५०० किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारे जलदगती गोलंदाज एकाच कसोटी सामन्यात खेळत असल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. इंग्लंडकडून सर्वात आधी जेम्स अँडरसनने ५०० बळींचा टप्पा ओलांडला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे जेम्स अँडरसनचा ५०० वा बळीही क्रेग ब्रेथवेट हाच ठरला होता.

गोलंदाजीव्यतिरीक्त पहिल्या डावात अर्धशतक झळकावत ब्रॉडने आपली फलंदाजीतली कमालही दाखवली होती. ब्रॉडच्या अर्धशतकाच्या जोरावरच इंग्लंडने पहिल्या डावात ३६९ धावांचा पल्ला गाठला. यानंतर पहिल्या डावात गोलंदाजीदरम्यान ब्रॉडने ६ बळी घेतले होते.