सेनादल व कर्नाटक यांनी सफाईदार विजय नोंदवित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत बाद फेरीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. सेनादलाने बिहार संघाला ११-० अशी धूळ चारली. त्यावेळी त्यांच्याकडून सन्वर अली याने तीन गोल केले तर एस.अरुमुगम, सिराजू, जॉनी जसरोशिआ व इग्नेस तिर्की यांनी प्रत्येकी दोन गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. कर्नाटकनेही एकतर्फी लढतीत गोव्याचा २०-० असा धुव्वा उडविला. त्यावेळी विजयी संघाकडून एम.के. मडप्पा याने गोलांचा चौकार नोंदविला तर एस.के. उथप्पा व एम.जी. पुनेच्छा यांनी प्रत्येकी तीन गोल केले.
मणिपूरनेही धडाकेबाज विजय नोंदविताना उत्तराखंडला १०-० असे नमविले. मणिपूर संघाकडून के.एस. व्हिक्टर याने हॅट्ट्रिकसह पाच गोल केले. गनेंद्रजित याने दोन गोल करीत त्याला चांगली साथ दिली. संयुक्त विद्यापीठ संघाने गुजरातचा १९-० असा दारुण पराभव केला. त्यावेळी त्यांच्याकडून फैजीन कंदुलाला याने चार गोल करीत महत्त्वाची कामगिरी केली.

नामधारी इलेव्हनच्या पाच खेळाडूंवर बंदी
रेल्वे संघाकडून पराभव स्वीकारल्यानंतर या संघातील खेळाडू बहादूर सिंग याला नामधारी इलेव्हनच्या शेर सिंग, हरप्रित सिंग, गुरप्रित सिंग, गुरविंदर सिंग व दीदार सिंग या पाच खेळाडूंनी शिवीगाळ केली होती तसेच त्याच्या खोलीत जाऊन त्याला मारहाण केली होती. रेल्वे संघ व्यवस्थापनाने संयोजकांकडे याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर हॉकी इंडियाने या पाचही खेळाडूंवर पाच वर्षांकरिता बंदी घातली आहे तसेच त्यांना २५ हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली.