जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेला सोमवारपासून चीनमधील गुआंगझाऊ शहरात प्रारंभ होत असून, पहिलाच दिवस अजय जयराम आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या अनुभवी खेळाडूंसाठी कसोटीचा ठरणार आहे.
जयरामला पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या विंग कीवोंग याच्याशी खेळावे लागणार आहे. कीवोंग याला या स्पध्रेत १२वे मानांकन देण्यात आले आहे. जयरामने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक वेळा अनपेक्षित विजय नोंदविले आहेत. त्यामुळेच या महत्त्वाच्या स्पध्रेतही त्याच्याकडून अशाच पराक्रमाची अपेक्षा केली जात आहे. भारताचा ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यप याच्यासाठी पहिल्या फेरीत सोपा पेपर आहे. १३व्या मानांकित कश्यपला इस्तोनियाच्या मुस्ट रॉल याच्याशी खेळावे लागणार आहे.
 अश्विनी ही महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे हिच्या साथीने प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाली आहे. अश्विनीने ज्वाला गट्टासोबत या स्पर्धेत कांस्यपदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली होती. तसेच या जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला होता. यंदाच्या मोसमात ही जोडी विभक्त झाली असून अश्विनीने प्रज्ञाच्या साथीने खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पध्रेत पहिल्या फेरीत त्यांना डेन्मार्कच्या मेरी रुईपेके व लिनी दाम्केजेर क्रुझ यांच्याशी खेळावे लागणार आहे.
अश्विनीला मिश्र दुहेरीचा सामनाही सोमवारी खेळावा लागणार आहे. अश्विनी व तरुण कोना यांची पहिल्या फेरीत हिरोकात्सू हाशिमोतो व मियुकी माएदा यांच्याशी गाठ पडणार आहे. मिश्र दुहेरीतच अपर्णा बालन व अरुण विष्णू यांच्यापुढे मिन चुन लिओ व हेसिओ हुआन चेन (चीन तैपेई) यांचे आव्हान असणार आहे. अपर्णाला महिला दुहेरीमध्ये एन.सिक्की रेड्डी याच्यासोबत लॉरेन स्मिथ व गॅब्रिएल व्हाइट या ब्रिटिश जोडीशी झुंज द्यायची आहे.