भारतीय पुरुष संघाची थॉमस चषक बॅडमिंटन स्पध्रेतील वाटचालीचा बुधवारी गोड शेवट झाला. सिरी फोर्ट क्रीडा संकुलात झालेल्या ‘क’ गटाच्या सामन्यात भारतीय पुरुषांनी जर्मनीवर ३-२ असा सनसनाटी विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने मलेशियाकडून १-४ अशी तर कोरियाकडून २-३ अशी हार पत्करल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा आधीच मावळल्या होत्या.
के. श्रीकांतने चांगली सुरुवात करून देताना मार्क झ्वेबलरचा ५६ मिनिटांत २१-१८, १८-२१, २१-१८ असा पराभव केला. परंतु जर्मनीच्या मायकेल फुश आणि जोहानीस शॉटलर जोडीने मनू अत्री आणि बी. सुमीथचा २१-१५, २१-६ असा पराभव करून १-१ अशी बरोबरी साधली.
कर्णधार पारुपल्ली कश्यपने दुसऱ्या एकेरीत जोरदार टक्कर दिली. पण डायटर डोमकेने ही लढत २३-२१, १४-२१, २१-१४ अशा फरकाने जिंकून २-१ अशी आघाडी जर्मनीला मिळवून दिली. त्यानंतर अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने पीटर काइसबौर आणि जोसचे झुजवॉनी जोडीचा २१-९, १७-२१, २१-१९ असा पराभव करून भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.
त्यानंतर तिसऱ्या एकेरीच्या लढतीवर भारताचे भवितव्य अवलंबून होते. आरएमव्ही गुरुसाइदत्तने ल्युकास शिमिटचा १४-२१, २१-१९, २१-१९ असा रंगतदार लढतीत पराभव करून भारताला दिलासा दिला.
गुणांकन पद्धतीविरोधात गोपीचंद, लिन डॅनचा आक्षेप
नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघ गुणांकन पद्धत बदलण्याचा विचार करत असून याविरोधात चीनचा महान बॅडमिंटनपटू लिन डॅन आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘‘सध्याच्या गुणांकन पद्धतीत कोणताही बदल करण्याची आवश्यकता मला तरी भासत नाही. विद्यमान पद्धतीवर कुणीही टीका केलेली नाही. या पद्धतीनुसार बॅडमिंटन खेळ अधिक लोकप्रिय होत चालला आहे,’’  असे गोपीचंदने सांगितले. प्रत्येक सामन्यात २१ गुणांचे दोन गेम किंवा १५ गुणांचे तीन गेम किंवा ९ गुणांचे पाच गेम या तीन पर्यायांचा विचार जागतिक बॅडमिंटन महासंघ करत आहे.

जागतिक प्रौढ बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताची बोली
नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने २०१६ साली होणाऱ्या जागतिक प्रौढ बॅडमिंटन स्पर्धेसाठी बोली लावण्याचे ठरवले आहे. याविषयी असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता म्हणाले, ‘‘भारतीय बॅडमिंटनचे भवितव्य उज्ज्वल आहे. जागतिक प्रौढ अजिंक्यपद स्पर्धेसाठी आम्ही बोली लावणार असून सुदिरमन चषकसारख्या स्पर्धाही भारतात आयोजित करण्याचा आमचा विचार आहे.’’