२०१८मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत घडलेले बॉल टेम्परिंग प्रकरण आता चांगले तापताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या घटनेत सँड पेपर लपवणाऱ्या कॅमेरून बॅनक्रॉफ्टने गोलंदाजांना या घटनेची माहिती असल्याचा मोठा खुलासा केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी आपले मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड आणि नॅथन लायन यांनी मैदानात आणल्या जाणार्‍या बाह्य गोष्टीची माहिती नसल्याचे सांगितले होते. आता या प्रतिक्रियेवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने आपले मत दिले आहे.

क्लार्क म्हणाला, ”गोलंदाजांनी दिलेल्या स्पष्टीकरणाशी मी सहमत नाही. मी जेव्हा बॅनक्रॉफ्टच्या बाबतीत मत दिले, तेव्हा काही लोकांना याचा त्रास होईल हे मला ठाऊक होते. या चार गोलंदाजांसाठी मी हे वैयक्तिक मत दिलेले नाही. ते माझे मित्र आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि त्या खेळाडूंनी हा संवाद पुढे कसा आला हे पाहिले पाहिजे. गोलंदाजांची प्रतिक्रिया ही फार हुशारीने समोर आणली गेली आहे. मी येथे प्रत्येक शब्दाबद्दल बोलणार नाही. मी जे बोललो ते बोललो. माझा त्यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. मी ज्यावर विश्वास ठेवतो, त्याबद्दलच बोललो.”

गोलंदाजांची प्रतिक्रिया

”कोणतीही बाहेरची वस्तू मैदानात आणली गेली हे आम्हाला माहित नव्हते जेणेकरून चेंडू बदलू शकेल. न्यूलँड्सच्या मोठ्या स्क्रीनवर फोटो पाहिल्याशिवाय आम्हाला याबद्दल माहिती नव्हती. या कसोटीचे पंच नायजेल लाँग आणि रिचर्ड इलिंगवर्थ दोघेही आदरणीय आणि अनुभवी लोक आहेत. टीव्ही कव्हरेजमध्ये फोटो दिसल्यानंतर त्यांनी चेंडूची तपासणी केली होती, ज्यात चेंडूला छेडछाड केल्याचे काही आढळले नव्हते. न्यूलँड्सच्या मैदानावर जे झाले, ते चुकीचे होते. असे पुन्हा झाले नाही पाहिजे. आम्ही सर्वांनी महत्त्वपूर्ण धडा शिकला आहे. आम्हाला असे वाटते की प्रेक्षक आपल्यात खेळण्याच्या पद्धतीसह आमच्यात सकारात्मक बदल पाहतील. आम्ही चांगले मनुष्य आणि खेळाडू बनण्यासाठी सुधारत राहू. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे”, असे या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सांगितले.

बॉल टेम्परिंगची घटना

२०१८च्या मार्चमध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली होती. या मलिकेच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान टीव्हीवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला सँडपेपरचा पिवळा तुकडा लपवताना पाहण्यात आले होते. याच दिवशी संध्याकाळी स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टने यासंबंधी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुद्दाम चेंडूंशी छेडछाड केल्याचे कबूल केले होते. मात्र, नंतर या प्रकरणात वॉर्नरही दोषी असल्याचे समजले होते.