चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांकरिता बंदीची कारवाई झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आगामी आयपीएलसाठी आठ फ्रँचाईजी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
आयपीएलच्या नियामक समितीची तातडीची बैठक मुंबई येथे रविवारी आयोजित केली आहे. या बैठकीत आगामी आयपीएलसाठी नवीन दोन संघ घेण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दोन संघ कसे घ्यावयाचे याची योजना तयार करावी, असा प्रयत्न मंडळाचे काही पदाधिकारी करीत आहेत. आयपीएलचे आयुक्त राजीव शुक्ला हे गुरुवारी मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेणार असून त्यामध्ये लोढा समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी कशी करावयाची याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, ‘‘आम्ही लोढा समितीच्या अहवालानुसार भविष्यात काय सुधारणा करता येईल याबाबत चर्चा केली आहे. सध्याच्या स्वरूपानुसार आठ संघांच्या आयपीएलकरिता मंडळाकडूनच दोन संघ दोन वर्षांकरिता तयार केले जाण्याचा पर्यायही तपासून पाहिला जात आहे. तसेच या दोन संघांकरिता रीतसर निविदा मागविण्याचा पर्याय पाहिला जाणार आहे. बीसीसीआयमधील बरेचसे सदस्य नवीन दोन संघांकरिता निविदा मागविण्याच्या पर्यायाबाबत आग्रही आहेत. तसेच बीसीसीआयनेच दोन संघ तयार करणे फायदेशीर होणार नाही, असेही या सदस्यांचे मत आहे.’’